Rain Update : नाशिक : नाशिक जिल्ह्याला पावसाचा अलर्ट

Rain Update

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दोन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये पाऊस परतला असून, गुरुवारी (दि.15) ठिकठिकाणी त्याने हजेरी लावली. नाशिक शहर व परिसरात दिवसभर हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. त्र्यंबकेश्वर आणि गंगापूरच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिक असल्याने धरणाच्या विसर्गात सात हजार क्यूसेकपर्यंत वाढ करण्यात आली. त्यामुळे गोदाघाट पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे. येत्या 24 तासांत जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

अरबी समुद्रातील कमीदाबाच्या पट्ट्यामुळे तसेच बंगालच्या उपसागरात पावसासाठी पोषक वातावरणनिर्मितीमुळे राज्यात पावसाने पुनरागमन केले आहे. जिल्ह्यातही त्याने मुक्काम ठोकला आहे. नाशिक शहरात बुधवारी (दि.14) मध्यरात्रीपासून पाऊस सुरू असून, दिवसभरात अधुनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत आहेत. त्यामुळे शहरवासीयांची कोंडी झाली. गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात त्याचा जोर कायम असून, धरणातील आवक वाढली आहे. त्यामुळे धरणातील विसर्गात प्रथमत: 2000 व 5117 क्यूसेकपर्यंत वाढ करण्यात आली. रात्री 8 ला हाच विसर्ग सात हजार क्यूसेकपर्यंत नेण्यात आल्याने गोदाघाट चौथ्यांदा पाण्याखाली गेला आहे. गंगापूरमधून सोडलेल्या पाण्यामुळे गोदाघाटावरील मंदिरे पाण्याखाली गेली असून, सांडवेदेखील बंद झाल्याने दोन्ही बाजूकडील जनजीवन विस्कळीत झाले.

जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी यासह अन्य तालुक्यांमध्ये ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवनावर त्याचा परिणाम झाला आहे. तर दारणा, पालखेड, चणकापूरसह अन्य धरणांच्या विसर्गात काहीअंशी वाढविण्यात आला आहे.

24 तासांमध्ये जोर वाढण्याचा अंदाज
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार रविवारपर्यंत (दि.18) जिल्ह्यात पाऊस हजेरी लावेल. त्यातही पुढील 24 तासांमध्ये त्याचा जोर अधिक वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष करून नदीकाठच्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा :

The post Rain Update : नाशिक : नाशिक जिल्ह्याला पावसाचा अलर्ट appeared first on पुढारी.