नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बहीण-भावाच्या नात्याला घट्ट करणारा रक्षाबंधन सणावर गेली दोन वर्षे कोरोनाचे सावट होते. यंदा संपूर्ण देश कोरोना निर्बंधमुक्त झाल्याने गुरुवारी (दि.11) सर्वत्र रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या सणासाठी राख्यांच्या विविध प्रकारांनी बाजारपेठ सजली असून, राखी खरेदी करण्यासाठी महिलावर्गाची मोठी लगबग सुरू आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

रक्षाबंधनासाठी बाजारात आकर्षक राख्या दाखल झाल्या आहेत. रेशीमच्या राख्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तसेच स्टोन राखी, देवराखी, जरदोजी डायमंड, ईडी पॅटर्न, ब—ेसलेट राखी, लुंबा राखी, मेटल राखी यासाख्या फॅन्सी राख्यांसह पारंपरिक पद्धतीच्या राख्या उपलब्ध आहेत. अवघ्या एक रुपयापासून ते सातशे रुपयांपर्यंत राख्यांची किंमत असून, ग्राहकांची पसंतीही सुंदर व नाजूक डिझाइन असलेल्या राख्यांची खरेदी करण्यास आहे. लहान मुलांच्या आवडीच्या कार्टूनमधील राख्यांना जास्त आहे. म्युझिकल व लायटिंग असणार्‍या राख्यांना बच्चेकंपनीची पसंती मिळत आहे.

नोकरी अथवा शिक्षणाच्या निमित्ताने इतर शहरांमध्ये राहणार्‍या प्रत्येक भावापर्यंत बहिणीची राखी वेळेत पोहोचावी, यासाठी भारतीय टपाल विभागाकडून विशेष योजना राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत अवघ्या 10 रुपयांमध्ये वॉटरप्रूफ पाकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. या योजनेलाही चांगला प्रतिसाद लाभत आहे. विविध प्रकारचे मणी, खडे, यांचा वापर करून तयार केलेल्या व वजनाने हलक्या असलेल्या राख्या पोस्टाने पाठविल्या जात आहेत.

The post Raksha Bandhan : रक्षाबंधनाचा नाशिकमध्ये अमाप उत्साह appeared first on पुढारी.