Ramdas Athawale : खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच, पक्षचिन्हदेखील शिंदे गटालाच मिळणार

रामदास आठवले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या वादात शिवसेनेत उभी फूट पडली आहे. मात्र, या वादात एकनाथ शिंदे यांची सरशी झाली असून, खरी शिवसेना शिंदे यांचीच आहे. तर बरी शिवसेना उद्धव ठाकरे यांची आहे. त्याचबरोबर पक्षचिन्हदेखील शिंदे गटालाच मिळणार असून, रिपाइंत जेव्हा फूट पडली तेव्हा पक्षचिन्ह कोणत्या गटाला मिळाले याचे उदाहरण देत केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची धाकधूक वाढविली.

नाशिक दौर्‍यावर असताना शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्यात नव्याने आलेल्या शिंदे सरकारचे तोंडभरून कौतुक केले. आठवले यांनी म्हटले की, ‘देवेंद्र फडणवीस यांनी मोठे मन दाखवून शिंदेंना मुख्यमंत्री बनवले. या दोघांची जोडी राज्यात चांगले काम करीत आहे. शिवाय खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निर्णय निवडणूक आयोग देईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. आठवले यांनी म्हटले की, राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. आठ लाखांच्या आतमध्ये ज्यांचे उत्पन्न आहे, त्या मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. यानंतरची लढाई सर्वोच्च न्यायालयात असून, तेथे न्याय मिळेल. शिवसेनेत पडलेल्या फुटीविषयी आठवले म्हणाले की, अशीच फूट रिपाइंमध्ये झाली होती. गवई, कवाडे आणि मी वेगवेगळ्या बाजूला होतो. गवईंकडे दोन खासदार असल्याने पक्षचिन्ह त्यांना मिळाले, बाकी संपूर्ण पक्ष माझ्या बाजूला होता. त्यामुळे या प्रकरणातही शिंदे यांच्या बाजूने बहुमत असल्याने धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे यांच्याकडेच राहील, असेही आठवले म्हणाले.

मोदींसमोर नितीशकुमार हा चेहरा नाही
बिहारमध्ये नितीशकुमार अगोदर लालूप्रसाद यादव यांच्यासोबत होते. नंतर ते मोदींसोबत गेले, आता पुन्हा ते मोदींसोबतच येतील. नितीशकुमार यांचे बिहारमधील सरकार फार काळ टिकणार नाही. नितीशकुमार भाजप सोडून गेल्याने एनडीएला काही फरक पडणार नाही. त्यांनी धोका दिला तर त्यांचे आमदार फुटून परत येतील. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी नितीशकुमार चेहरा नाही. त्याचबरोबर मोदींच्या समोर ममता बॅनर्जी, नितीशकुमार, सोनिया गांधी, शरद पवार कुठलेच चेहरे चालणार नाही. भाजप मित्रपक्ष संपवतेय हे खरं नाही. माझा पक्ष वाढतोय, असेही आठवले म्हणाले

वंदे मातरम्ला विरोधाची गरज नाही
रिपाइंमध्ये सर्व जाती-धर्माचे लोक यावेत यासाठी प्रयत्न करीत आहे. निवडणुकांवेळी आम्हाला इतरांची मते मिळत नाही, पण आम्ही ज्यांना पाठिंबा देतो ते निवडून येतात. तसेच रिपाइंला मंत्रिमंडळात स्थान मिळावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व अधिकार्‍यांना फोनवर वंदे मातरम म्हणण्यास सांगितले आहे. मुळात वंदे मातरम् म्हणण्याचा निर्णय चांगला आहे, त्याला विरोध करण्याची गरज नसल्याचेही आठवले म्हणाले.

हेही वाचा :

The post Ramdas Athawale : खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच, पक्षचिन्हदेखील शिंदे गटालाच मिळणार appeared first on पुढारी.