Rare Wildlife : दुर्मीळ वन्यजीव ठरताय अंधश्रद्धेचे बळी ; नाशिकमध्ये तस्करीतून कोटींची उलाढाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
समाजातील अंधश्रद्धेमुळे वन्यजीव (Rare Wildlife) तस्करी सर्वत्र फोफावली असून, तस्करांकडून वन्यजीवांच्या अवयवांचा बाजार मांडला जात आहे. रविवार कारंजावरील एका दुकानावर वनविभागाने मंगळवारी (दि. 5) छापा टाकत हा प्रकार उघडकीस आणला आहे. दुकानमालक केव्हापासून याची विक्री करत होता आणि त्याला हे अवयव पुरविणारी टोळी कोण, याचा शोध आता घेतला जात आहे.

शहरासह ग्रामीण भागातील वनौषधी तसेच पूजेच्या साहित्य विक्रीच्या दुकानातून वन्यजीवांच्या अवयवांची तर पेटशॉपमधून दुर्मीळ वन्यजीवांची (Rare Wildlife) सरार्स विक्री होत आहे. वन्यजीव अवयवांच्या तस्करीत कोट्यवधींची उलाढाल होते. ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे दुर्मीळ वन्यजीवांवर संकट ओढावले आहे. रविवार कारंजावरील सुखलाल दगडू तेली चांदवडकर यांच्या मालकीच्या दुकानावर वनविभागाने छापा संवेदनशील प्राण्यांचे अवयव जप्त करत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यातून नाशिकमध्ये वन्यजीवांच्या तस्करीचे काळे धंदे उजेडात आले आहेत.

वन्यजीवांच्या (Rare Wildlife) शिकारी, त्यांच्या अवयवांचा अवैध व्यापार व तस्करी तसेच वनसंपदेची चोरटी वाहतूक सातत्याने घडत आहे. खरेदी-विक्रीसह स्वतःजवळ बाळगणे अथवा पाळण्यास मनाई असलेले दुर्मीळ वन्यजीव तसेच त्यांचे अवयव मागणीनुसार ग्राहकांना उपलब्ध करून दिले जातात. स्थानिक शिकार्‍यांना हाताशी धरून तस्करांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. राज्यासह परराज्यातही स्लिपर सेलचे नेटवर्क सक्रिय आहे. त्यामुळे वनविभागासह इतर यंत्रणांना कारवाई करताना मर्यादा येतात.

ग्राहकांकडून हौस व ऐट दाखवण्यासह अंधश्रद्धा आणि गैरसमजुतीमुळे वन्यजीवांना नष्ट केले जात आहे. वन्यजीवांविषयीची अंधश्रद्धा केवळ सामान्य व्यक्तींपुरती मर्यादित नसून, राजकीय नेत्यांमध्येही आहे. वन्यजीव संरक्षक कायदे कडक असले आणि एकदा अटक झाल्यानंतरही दुसरे तस्कर निर्माण होत असल्यामुळे तस्करी नियंत्रण येत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, वनविभागाकडून तस्करांविरोधात कारवाया केल्या जातात. या कारवाई झालेल्या वन्यजीवांच्या सुटकेपेक्षाही जास्त प्राण्यांची तस्करी होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

यासाठी होते तस्करी
गुप्तधनाच्या नावाखाली मांडूळ सापाची तस्करी, नागमणीच्या नावाखाली नागाची हत्या, लक्ष्मीचे वाहन म्हणून शृंगी घुबडाची विक्री, घरात शांतता राहण्यासाठी इंद्रजाल, समुद्री कंकाळ (सी-फॅन), हत्ताजोडी (घोरपडीचे गुप्तांग) साळिंदर वन्यप्राण्याच्या शरीरावरील काटे आदींची तस्करी होते. साळिंदरच्या काट्याचा विषप्रयोगासाठी वापर होतो. हौस म्हणून पोपट, ससाणे पक्ष्यांसह मुंगसाला डांबून ठेवले जाते.

समाजात वन्यजीवांबाबत अंधश्रद्धा पसरल्या आहेत. नागरिकांना वेगवेगळे आमिषे दाखवून वन्यजीवांबाबत आकर्षण निर्माण करून मांत्रिक त्यांची सहज आर्थिक फसवणूक करतात. नागरिकांनी पर्यावरणद़ृष्ट्या संवेदनशील असलेल्या वन्यजीवांची खरेदी टाळावी. तसेच मांत्रिकांच्या अंधश्रद्धेला बळी पडू नये.
– डॉ. ठकसेन गोराणे,
राज्य प्रधान सचिव (अंनिस)

हेही वाचा :

The post Rare Wildlife : दुर्मीळ वन्यजीव ठरताय अंधश्रद्धेचे बळी ; नाशिकमध्ये तस्करीतून कोटींची उलाढाल appeared first on पुढारी.