Sahitya Sammelan : नाशिकच्या अ.भा. साहित्य संमेलनाच्या तारखांवर शिक्कामोर्तब 

<p style="text-align: justify;"><strong>Nashik Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan :</strong> कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे नाशिक येथे होणारे 94 वे मराठी साहित्य संमेलन काही काळासाठी स्थगित करण्यात आलं होतं. मात्र, राज्यातील कोरोनाची परिस्थिती निवळत असल्यामुळे यंदाचं मराठी साहित्य संमेलन याच वर्षी होणार आहे. 19, 20 आणि 21 नोव्हेंबर या तारखेला मराठी साहित्य संमेलन घेण्याचं जवळपास निश्चित झालेय. या तारखांवर नाशिकमधील संयोजन समिती आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे एकमत झाले आहे. यामुळे नाशिककर साहित्यप्रेमींना संमेलनाची भरगच्च मेजवानी मिळणार आहे.</p> <p style="text-align: justify;">साहित्य संमेलनाच्या तारखांवर शिक्कामोर्तब झालं असले तरी स्थळाबाबत अद्याप अनिश्चितता आहे. कारण, नाशिकमधील गोखले एज्युकेशन सोसायटीमध्ये साहित्य संमेलन होणार होतं. मात्र महाविद्यालयं सुरू झाली असल्याने हे स्थळ बदलणार असल्याची माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.&nbsp;</p> <p style="text-align: justify;">कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संमेलनाची शक्यता धूसर झाली होती. संसर्ग आटोक्यात आल्यानंतर संमेलन होण्यातील अडथळे दूर झाले. ऑगस्टमध्ये संयोजन समिती आणि साहित्य महामंडळ यांची बैठक झाली. त्यावेळी 19, 20,21 नोव्हेंबर या तारखांना संमेलन घेण्याबाबत संयोजन समितीने सांगितले. त्यानंतर महामंडळ आणि संयोजन समिती यांच्यात दोन वेळा पत्रव्यवहार झाला. त्यात या तारखा समोर आल्या. या तारखाही राज्य शासनाला कळवण्यात आल्याचं समजतेय. 19, 20,21 नोव्हेंबर या तारखांवर आम्ही सकारत्मक आहोत. या तारखा शासनाला माहिती म्हणून पाठविल्याचं कौतिकराव ठाले-पाटील यांनी सांगितलं.&nbsp;</p>