Sambhaji Raje Chhatrapati : …तर ‘स्वराज्य’ही निवडणुकीच्या रिंगणात, संभाजीराजेंचे संकेत

छत्रपती संभाजीराजे : राज्यसभा निवडणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्वराज्य संघटनेची स्थापना शेतकरी, कामगार, शिक्षकांसह वंचित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी केली आहे.  अशात सरकार अन् राजकीय पक्षांकडून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होत नसतील, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ‘स्वराज्य’ही मैदानात उतरेल, असे स्पष्ट संकेत स्वराज्य संघटनाप्रमुख, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले (Sambhaji Raje Chhatrapati)  यांनी दिले.

शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संभाजीराजे पुढे म्हणाले की, कोणताही राजकीय हेतू समोर ठेवून स्वराज्य संघटनेची स्थापना केलेली नाही, तर पूर्णपणे सामाजिक उद्देशाने ही संघटना काम करीत आहे. गाव तेथे शाखा अन् घराघरात स्वराज्य ही संकल्पना आमची असणार आहे. अन्यायाविरोधात लढा देण्याचा संघटनेचा मुख्य उद्देश आहे. मात्र, शासनाकडून जनतेची कामे होत नाहीत, ही बाब जेव्हा लक्षात येईल, तेव्हा स्वराज्य संघटना निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. दरम्यान, नाशिकमध्ये दोनदिवसीय दौर्‍याप्रसंगी विविध कार्यक्रमांत त्यांनी सहभाग घेतला. यावेळी विविध गावांमध्ये संघटनेचे शाखा उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे राज्य प्रवक्ते करण गायकर, गणेश कदम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

‘सारथी’च्या उद्घाटन पत्रिकेत राजेंना डावलले

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात ‘सारथी’चे विभागीय कार्यालय नाशिकरोड येथील विभागीय आयुक्तालय परिसरात साकारण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 21) कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आयोजित केला आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, दादा भुसे, अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. मात्र, ज्यांनी विभागात ‘सारथी’च्या कार्यालयाची मागणी केली, त्यांनाच उद्घाटनाला न बोलाविल्याने संभाजीराजे यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. ‘सारथी’ संस्थेच्या कार्यक्रमाला संभाजीराजेंना डावलल्याचा आरोप होत असून, हा कार्यक्रम होऊ देणार नसल्याचा इशारा संघटनेचे प्रवक्ते करण गायकर यांनी दिली आहे.

हेही वाचा :

The post Sambhaji Raje Chhatrapati : ...तर ‘स्वराज्य’ही निवडणुकीच्या रिंगणात, संभाजीराजेंचे संकेत appeared first on पुढारी.