
नाशिक: पुढारी वृत्तसेवा ; आमदार अपात्रतेप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर ताशेरे ओढल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. मृत्यूशय्येवरील सरकारला विधानसभा अध्यक्षांनी आयसीयुमध्ये ठेवून जितके वाचवायचे होते तितके वाचविण्याचा प्रयत्न केला. आता मात्र विधानसभा अध्यक्षांनाच आयसीयुमध्ये टाकण्याची वेळ आली आहे. न्यायालयाने हातोडा विधानसभा अध्यक्षांच्या टाळक्यात मारला आहे, अशी जळजळीत टीका करत येत्या ७२ तासात हे सरकार जाणार, असा दावा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या खा. राऊत यांनी शुक्रवारी (दि.१३) माध्यमांशी संवाद साधला. आमदार अपात्रतेप्रकरणात विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयाने खडे बोल सुनावल्यानंतर खा. राऊत यांनी नार्वेकरांवर कठोर शब्दांत प्रहार केला आहे. ते म्हणाले की, विधानसभेचे अध्यक्ष हे खडे बोल सुनावण्याच्या योग्यतेचेच आहेत. आमदार अपात्रता प्रकरणाला संवैधानिक पध्दतीने हाताळणे गरजेचे होते. परंतू हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांनी गांभिर्याने घेतले नाही. हे लोक सर्वोच्च न्यायालयाला नौटंकी समजत असावेत. अखेर न्यायालयानेच ‘सौ सोनार की आणि एक लोहार की’ ही म्हण खरी करून दाखवत नार्वेकरांच्या टाळक्यात हातोडा मारला आहे. आता तरी त्यांनी आणि त्यांच्या पालकांनी शहाणपणाने वागायला हवे. अन्यथा हे लोक न्यायव्यवस्था कशी पायदळी तुडवतात हे उघड होईल. आम्हाला आदेश द्यावा लागेल, असे न्यायालयाने सांगितलेच आहे.
विधानसभा अध्यक्षांनी बाबासाहेबांचे संविधान हलक्यात घेऊ नये, असे सुनावत सरकार जाण्याची वेळ आता आली आहे. यापूर्वी देखील आम्ही हे सरकार ७२ तासात जाणार हे सांगितले होते. परंतू दिल्लीत जाऊन आदेश घेऊन आलेल्या नार्वेकरांनी हे सरकार जितका वेळ आयसीयुत ठेवून वाचवता येईल, तितके वाचविले आहे. आता विधानसभा अध्यक्षांनाच आयसीयुत ठेवण्याची वेळ आली आहे, अशी टीका खा. राऊत यांनी केली.
हेही वाचा :
- Stock Market Closing Bell | IT आणि बँक शेअर्सनी बिघडला बाजाराचा मूड, नेमकं काय झालं?
- Sushma Andhare News : ससून ड्रग्ज प्रकरणात डॉ. संजीव ठाकूर यांची नार्को टेस्ट करा; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
The post Sanjay Raut : ७२ तासात राज्यातील सरकार जाणार appeared first on पुढारी.