Site icon

Sant Nivrittinath Vari Trimbakeshwar : पायी दिंड्यांना भजन-वादनाला अटकाव, जिल्हाधिकाऱ्यांचा अजब फतवा अन् नरमाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर येथील पौषवारीकरिता (Sant Nivrittinath Vari Trimbakeshwar) प्रस्थान करणाऱ्या पायी दिंड्यांना शहर परिसरात गायन-वादन आणि भजनास अटकाव करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी तसा तोंडी फतवाच काढल्याने संत निवृत्तिनाथ महाराज ट्रस्ट व त्र्यंबकेश्वर येथील पदाधिकाऱ्यांनी त्यांना धारेवर धरले. वारकऱ्यांच्या भावना दुखावू नका. दिंड्यांच्या मार्गात अडथळे आणू नका, असा इशारा देताच जिल्हाधिकाऱ्यांनी नरमाईची भूमिका घेत दिंड्यांमध्ये प्रशासन बाधा येणार नाही, असे आश्वासन दिले.

त्र्यंबकेश्वर येथे बुधवारी (दि.१८) संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यात्राेत्सव (Sant Nivrittinath Vari Trimbakeshwar) भरणार आहे. कोरोनाच्या तीन वर्षांच्या खंडांनंतर हा यात्रोत्सव होत असल्याने राज्यभरातून ४ ते ५ लाख वारकरी त्र्यंबकनगरीत दाखल होण्याच्या अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि.१०) जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या अध्यक्षतेत ‘निर्मल वारी’ बैठक पार पडली. यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी आणि वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

‘निर्मल वारी’ आयोजनाबाबत बैठकीत दर्शन बारीतील गर्दीत उद्भविणारे प्रश्न, कुशावर्तावर स्नानासाठी आवश्यक स्वच्छ पाणी, पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीचा उडणारा फज्जा, वारीत चोरट्यांचा भाविकांना होणारा त्रास, वीज, पाणी आणि इतर सुविधांची आवश्यकता आदी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी याबाबत विविध समस्या मांडल्या. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना सूचना देत वारीसाठी पूर्वतयारीनिशी सज्ज राहण्याच्या सूचना केल्या. बैठकीसाठी पोलिस, एसटी, नगरपालिका, महसूल, महावितरण यांच्यासह अन्य शासकीय विभागांचे प्रमुख तसेच निवृत्तिनाथ ट्रस्टचे अध्यक्ष नीलेश गाढवे-पाटील, सचिव ॲड. सोमनाथ घोटेकर, विश्वस्त नारायण मुठाळ, अरुण काळे, जयंत महाराज गोसावी, राहुल साळुंके, कांचन जगताप, व्ही. डी. गंगापुत्र आणि भानुदास गोसावी आदी उपस्थित होते.

अशी असणार सज्जता

– गर्दीवर नियंत्रणासाठी सीसीटीव्ही कॅमेरे

– दिंड्यांच्या मानकऱ्यांसाठी राहुट्यांची व्यवस्था

– कुशावर्ताचे पाणी यात्राकाळात वारंवार बदलणार

– स्वच्छ आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा करणार

– नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर एसटीला स्पीड लिमिट

– १५०० शौचालयांची होणार उभारणी

– गर्दी नियंत्रणासाठी बॅरिकेडिंगवर भर देणार

– अतिरिक्त पाणी टँकरचा पुरवठा करणार

हेही वाचा :

The post Sant Nivrittinath Vari Trimbakeshwar : पायी दिंड्यांना भजन-वादनाला अटकाव, जिल्हाधिकाऱ्यांचा अजब फतवा अन् नरमाई appeared first on पुढारी.

Exit mobile version