Site icon

Saptshringigad : सप्तश्रृंगगडाच्या पहिल्या पायरीजवळ शेंदूर स्तंभ उभारणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वणी येथील सप्तश्रृंगी देवीची मूर्ती संवर्धन प्रक्रियेनंतर सप्तशृंगी मातेचे मूळ रूप समोर आले आहे. 45 दिवसांच्या कालावधीत देवीच्या मूर्तीवरून तब्बल अकराशे किलो शेंदूर काढण्यात आले आहे. या शेंदूरचा धार्मिक विधी करत गडावरील (Saptshringigad)  पहिल्या पायरीजवळ स्तंभ उभारण्यात येणार असल्याची माहिती सप्तश्रृंगी देवी ट्रस्टचे अध्यक्ष तथा न्यायाधीश वर्धन देसाई व संचालक ॲड. ललित निकम यांनी दिली.

ट्रस्ट व सुयश रुग्णालयाच्या सामंजस्य कराराची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ट्रस्टच्या माध्यमातून सप्तश्रृंगगडवरावर  मोठ्या प्रमाणात विकासकामे हाती घेण्यात आले आहेत. आगामी ५० वर्षांचा अंदाज घेऊन मंदिराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. विशेषत: संपूर्ण गाभारा हा चांदीचा असणार आहे. त्याबाबतचे डिझाईन तयार करण्यात आले असून, लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याचे ॲड. निकम यांनी सांगितले.

रोप वे समोरील ट्रस्टच्या जागेवर प्रशासकीय कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. शिवालय तलावाचे सुशोभीकरणही होणार असून, संचालक भूषणराज तळेकर यांनी आराखडा तयार केला आहे. गडाच्या पायथ्याशी असलेल्या कृषी व लाडू केंद्राचे लवकरच उद्घाटन होणार आहे. गड परिसराच्या सुशोभीकरणामुळे स्थानिक ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध मिळणार असल्याचे ॲड. निकम यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला डॉ. हेमंत ओस्तवाल, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. प्रदीप पवार, डॉ. मनीष बागरेचा, डॉ. पूजा ओस्तवाल-महाडिक, डॉ. सचिन महाडिक, डॉ. पुष्पक पलोड आदी उपस्थित होते.

स्थानिकांना आरोग्य कार्ड मिळणार

ट्रस्ट व सुयश रुग्णालयाच्या सामंजस्य करारामुळे गडावरील स्थानिकांसह ट्रस्टच्या कर्मचारी, सेवक व पुजाऱ्यांना आरोग्य कार्ड वितरित करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत ४० वर्षांवरील नागरिकांची आरोग्य तपासणी, १० वर्षांवरील मुली व महिलांसाठी मासिक पाळीच्या समस्यांसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल. नाशिक येथील रुग्णालयात दाखल केल्यास रुग्णांच्या खर्चात ३० टक्के सवलत मिळणार असल्याचे सुयश रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. हेमंत ओस्तवाल यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post Saptshringigad : सप्तश्रृंगगडाच्या पहिल्या पायरीजवळ शेंदूर स्तंभ उभारणार appeared first on पुढारी.

Exit mobile version