Saptshringigad : हायकोर्टाच्या निर्णयामुळे सप्तशृंगी गडावर यंदा ‘असा’ होणार दसरा

सप्तशृंगीदेवी www.pudhari.news

सप्तशृंगगड : (जि. नाशिक) प्रतिनिधी

सप्तशृंगी गडावर (Saptshringigad) दसऱ्याच्या दिवशी श्री भगवतीच्या मंदीर पायऱ्यांवरील दसरा टप्प्यावर प्रथा – पंरपरेनूसार पूर्वी पासून सुरु असलेली बोकड बळी देण्याची प्रथा पाच वर्षांपासून प्रशासनाने बंद केलेली होती. या प्रशासनाच्या निर्णया विरुध्द आदिवासी विकास संस्था, धोंडाबे ता.सुरगाणा या संस्थेने जुलै २०१९ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती. या जनहित याचिकेवेर उच्च न्यायालयात सुनावणी होवून न्यायालयाने याचिकाकर्त्याचे बाजूने निकाल देत अटी शर्तीनूसार बोकड बळी देण्याची प्रथा परंपरा पूर्ववत सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे गडावर यंदा बोकड बळी विधी होणार आहे.

सकाळी 8 वाजता शिवालय तलाव येथून या विधी सोहळ्यास सुरुवात होईल. वाजत गाजत गावातून मोठया उत्साहात मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणूक मंदिरात आल्यानंतर दसरा चौकात सकाळी 10 वाजता बोकड बळी विधी पार पडेल. त्यानंतर देवीची महाआरती करण्यात येईल. त्यानंतर मंदिरात होमहवन करुन आहुती देण्यात येईल व नवरात्रीची सांगता करण्यात येईल.

का बंद होता बोकड बळी विधी ?

दसऱ्याच्या निमित्ताने सप्तश्रृंगी गडावर बोकडबळी देण्याची प्रथा आहे. पाच वर्षांपूर्वी या प्रथेच्या निमित्ताने देण्यात आलेल्या सलामी (बंदुकीतून हवेत गोळीबार करणे) वेळी छररे उडून काही भाविक व देवस्थानच्या कर्मचारी वर्गाला दुखापत झाली होती. त्या अनुषंगाने देवस्थान ट्रस्ट मार्फत ही प्रथा सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद करण्यात आली. याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी आदेशही काढले होते. तेव्हा देखील ग्रामस्थ व भाविकांनी या निर्णयास विरोध दर्शविला होता. मात्र आदेश धुडकावला तर गुन्हे दाखल करण्यात येतील असा दमच प्रशासनाने दिल्याने ग्रामस्थांनी त्यावेळी गावाबाहेर जिल्हा परिषदेच्या शाळेत बोकडबळी चा कार्यक्रम केला होता व तो आजही सुरूच आहे.

देवस्थान ट्रस्टच्या आवाराबाहेर करण्यात आजही हरकत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र शुक्रवारी दुपारी कळवण तालुका प्रशासन व ग्रामस्थ व भाविक यांच्यात बोकडबळी होऊ द्यावे. दुष्काळी परिस्थिती आहे. जुन्या परंपरेला खंडित होऊ देऊ नका अशी पुन्हा एकदा मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. यापूर्वी अधिकारी वर्गाकडून बोकडबळी देतांना आहुती मंदिर परिसरात देण्यासाठी प्रतिसाद मिळाल्याने बळी मंदिर परिसराबाहेर दिला जातो व आहूती साठी मंदिर परिसरात परवानगी असते.

त्यावेळी प्रशासन व देवस्थान ट्रस्ट पदाधिकारी यांच्या भेटीत दोन वेगवेगळ्या बाबी पुढे आल्याने संतप्त ग्रामस्थांनी आपले व्यवसाय ऐन नवरात्रीच्या दिवसात बंद ठेवत ट्रस्ट कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला होता. यामुळे बोकडबळी च्या प्रथेसाठी संघर्ष पेटल्याचे दिसून आले होते. याबाबत धोडंबे आदिवासी विकास सोसायटीच्या पदाधिकारींनी ही प्रथा पूर्वीच्या परंपरेनुसार सुरू करावी ही भूमिका मांडली . त्यादृष्टीने जनहित याचिका दाखल केली. पण आता हा निर्णय लागल्याने मोठ्या जल्लोषात दसरा विधी पार पाडणार आहे.

हेही वाचा :

The post Saptshringigad : हायकोर्टाच्या निर्णयामुळे सप्तशृंगी गडावर यंदा 'असा' होणार दसरा appeared first on पुढारी.