Sharad Pawar : सत्ताधाऱ्यांची श्रद्धा अयोध्येवर, आमची शेतकऱ्यांवर

शरद पवार Sharad Pawar

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील सगळे मंत्रिमंडळ, सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी अयोध्येला गेले आहेत. ते त्यांच्या श्रद्धेचे ठिकाण आहे. आमची श्रद्धा मात्र शेतकऱ्यांवर आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

जिल्ह्यातील विकासकामांच्या लोकार्पणानिमित्त शरद पवार हे जिल्ह्याच्या दोनदिवसीय दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, अतिवृष्टीमुळे राज्यभरात नुकसान झाले आहे. नुकसानीची पाहणी, त्यांना आर्थिक, मानसिक दिलासा देणे हे सगळे सोडून सारे मंत्रिमंडळ, लोकप्रतिनिधींना घेऊन अयोध्येला जाण्यास मुख्यमंत्र्यांनी प्राधान्य दिले आहे. मात्र, कशाला प्राधान्य द्यायचे, हे एकदा त्यांनी ठरवले पाहिजे, असा सल्लाही अयोध्या दौऱ्यावर गेलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पवार यांनी दिला.. एकीकडे सर्व मंत्रिमंडळ, आमदार, खासदार अयोध्येत गेले. मात्र आमची श्रद्धा शेतकऱ्यांशी निगडित आहे. त्यामुळे प्रत्येकाची श्रद्धा वेगळी असते, अशी टिप्पणी त्यांनी केली.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काही भूमिकेला आमचा पाठिंबा नाही. त्यांनी हिंदुत्वाची जी भूमिका घेतली, ती मान्य नाही. पण सावरकरांनी पुरोगामी विचारही मांडले. जसे की त्यांनी घरासमोर मंदिर बांधले होते, त्या मंदिराचा पुजारी दलित वर्गातील होता. त्यामुळे सावरकरांबद्दल प्रत्येकाची भूमिका वेगळी असू शकते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

दरम्यान, काही दिवसांपासून सावरकर यांच्याविषयी देशासह राज्यात राजकारण तापले आहे. त्यातच महाविकास आघाडीमध्ये विसंगती असल्याचे बोलले जात आहे. यावर पवारांनी नाना पटोले पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना त्यांचे मत आहे. प्रत्येकामध्ये मतभिन्नता असते. मात्र येणाऱ्या निवडणुकांमध्ये आघाडीतील एकीचे चित्र दिसेल, असे उत्तर दिले.

पटोलेंच्या भूमिकेबाबत तक्रार नाही

जेपीसीबाबत प्रत्येकाची भूमिका वेगळी असू शकते. प्रत्येक पक्षाला एखाद्या प्रश्नावर स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार आहे. पटोले यांनी जी भूमिका घेतली, त्याबद्दल माझी काही तक्रार नाही. प्रत्येकाचे मत आहे. सध्या महागाई, बेरोजगारी असे अनेक प्रश्न आहेत. मात्र आज धर्म आणि जात यावर वाद सुरू आहे, असेदेखील पवार म्हणाले.

The post Sharad Pawar : सत्ताधाऱ्यांची श्रद्धा अयोध्येवर, आमची शेतकऱ्यांवर appeared first on पुढारी.