StartUP News : दहा सेकंदांत होणार मृदा परीक्षण अहवाल; आधुनिक तंत्रज्ञानामुळे होणार शेतकऱ्यांना फायदा

नाशिक : शेतीत मातीच्‍या पोतावर पीकपद्धतीसह अन्‍य बाबी अवलंबून असतात. त्‍यामुळे मृदा (माती) परीक्षणाला महत्त्व लाभले होते; परंतु सद्यःस्‍थितीत माती परीक्षण अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त होण्यासाठी शेतकऱ्यांना १५ दिवस ते महिनाभर वाट बघावी लागते. यावर नाशिकच्‍या इंटेलिजन्‍स टेकसोल प्रा.लि. या स्‍टार्टअपने सॉईल सेन्सर किटचा पर्याय उपलब्‍ध केला आहे. या उपकरणाद्वारे अवघ्या दहा सेकंदांत अहवाल प्राप्त होऊ शकतो.

इंटेलिजन्‍स टेकसोलतर्फे उपकरण विकसित

नाशिकस्‍थित इंटेलिजन्‍स टेकसोल प्रा.लि. या स्‍टार्टअपचा विस्‍तार नाशिकसह पुणे आणि कॅनडा येथे केलेला आहे. औद्योगिक कंपन्‍यांना उत्‍पादन पुरवीत होते. गेल्‍या दोन महिन्‍यांपूर्वी पुष्कर काळे, स्वप्नील बागूल, राजेश पहाडी, कुणाल पवार, मुग्‍धा दीक्षित, अम्रिता चौधरी या स्‍टार्टअप टीमने सॉइल सेन्सर किट विकसित केली आहे. या किटद्वारे मृदा परीक्षणाची पद्धत सोपी केलेली आहे. सध्याच्‍या प्रचलित पद्धतीनुसार शेतजमिनीतील विविध पाच ठिकाणांहून मातीचे नमुने घेतले जातात. चाळणीद्वारे साधारणतः एक किलो माती प्रयोगशाळेत पाठविली जाते. यावर परीक्षण करून अहवाल तयार केला जातो. हा अहवाल प्राप्त होण्यास काहीसा कालावधी लागत असतो. यावर तोडगा म्‍हणून हे डिव्हाइस काम करत असून, अवघ्या दहा सेकंदांत मोबाईलवर अहवाल मिळेल, अशी सुविधा केलेली आहे. 

पीक घेण्याबाबतही मार्गदर्शन 
पॉलिहाउस किंवा बागायतदार शेतकऱ्यांसाठी हे उपकरण विक्रीसाठी उपलब्‍ध केले असून, जमिनीत ठेवून नियमितपणे निरीक्षण उपलब्‍ध होण्याची सुविधा उपलब्‍ध होईल. छोट्या शेतकऱ्यांना माफक दरात चाचणी सुविधा उपलब्‍ध करून देण्याचे नियोजन आखले आहे. केवळ अहवाल उपलब्‍ध करून देण्यापुरते स्‍टार्टअपने काम मर्यादित ठेवलेले नसून, जमिनीच्‍या पोतानुसार कुठले पीक घेणे योग्‍य ठरेल, त्‍याचा सल्‍लादेखील दिला जाणार आहे. हे करताना पीक बाजारात येईल तेव्‍हा त्‍यास असलेली मागणी, बाजारमूल्‍य काय असेल, याचा साधारणतः अंदाजदेखील दिला जाणार आहे. सध्या अमेरिकेत अशा पद्धतीचे उपकरण उपलब्‍ध असून, भारतातील हे प्रथमच उपकरण असल्‍याचा दावा स्‍टार्टअपतर्फे केला आहे. 

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी  
असे काम करते उपकरण 

इंटरनेट ऑफ थिंग्‍ज (आयओटी)वर आधारित हे उपकरण असून, यात आयओटीचा डिव्‍हाइस असून, यात कस्‍टमाईज्‍ड सेन्सरचा वापर केलेला आहे. हे सेन्सर एफडीआय पद्धतीवर काम करतात. उपकरण जमिनीत ठेवल्‍यानंतर उपकरणात बॅटरीचा वापर केला असून, ठराविक फ्रिक्वेन्‍सी जमिनीत सोडली जाते. त्‍याचा प्रतिसाद म्‍हणून उपकरणात मिली व्‍होल्‍टमध्ये करंट पाठविला जातो. त्‍याची उपकरणात नोंद होऊन निर्धारित केलेल्‍या प्रोग्रामिंगद्वारे निष्कर्ष रिअल टाइम उपलब्‍ध होतात. प्रचलित पद्धतीच्‍या तुलनेत अहवाल ९० टक्क्‍यांपर्यंत बरोबर येत असून, हे प्रमाण शंभर टक्क्‍यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट

सेन्सर्ससह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर 
सॉइल सेन्सर किटद्वारे रिअल टाइल मृदा परीक्षण अहवाल प्राप्त होण्याची सुविधा आम्‍ही केलेली आहे. शेतकऱ्यांना जमिनीच्‍या पोताच्‍या आधारे पीक घेण्याबाबतही मार्गदर्शन करत आहोत. आमच्‍या उपकरणाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. -पुष्कर काळे, इंटेलिजन्‍स टेकसोल प्रा.लि..