Success Story : आदिवासी भागात बहरली इस्राईलची ‘कॅपसिकम’; बागूल दांपत्याचा यशस्वी प्रयोग

अभोणा (नाशिक) : कळवण तालुका आदिवासी पश्चिम पट्ट्यात भात, नागली यांसारखी पारंपरिक पिके घेतली जातात. पावसाचे कमी-जास्त प्रमाण, अनिश्चित बाजारभाव व शेतीबद्दलचा नकारात्मक दृष्टिकोन यात बदल करण्याच्या उद्देशाने अभोणा येथील प्रयोगशील शेतकरी दांपत्य डॉ. कमलाकर बागूल व सुजाता बागूल यांनी इस्राईलच्या ‘कलरफुल’ शिमला मिरचीचा प्रयोग आपल्या तिऱ्हळ या गावी यशस्वी करून तरुण शेतकऱ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे.

पॉलिहाउसमध्ये पाच हजार ५०० रोपांची लागवड

केवळ ३१ गुंठे क्षेत्राच्या पॉलिहाउसमध्ये इस्राईलमधील रिझवान येथून ‘बचाटा’ व ‘मसालिया’ जातीचे बियाणे मागवून नाशिक येथील नर्सरीत त्याची रोपे तयार केलीत. पॉलिहाउसमध्ये पाच हजार ५०० रोपांची लागवड केली. साधारणपणे तीन महिन्यांत झाडांना फळं यायला सुरवात झाली. पुढील सरासरी तीन ते चार महिने हा बहार असतो. पंधरा दिवसांनी एक टन उत्पादन होते. खासगी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून प्रतिकिलो रुपये ८० ते १२० चा भाव असतो. अहमदाबाद, बडोदा, मुंबई, दिल्ली, पुणे, हैदराबाद याठिकाणी या ‘कलरफुल’ शिमला मिरचीला चांगली मागणी आहे. आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून मोजक्या मजुरांच्या सहाय्याने हे उत्पादन मिळविले. औषध, पेस्टिंसाइड, ठिबक सिंचनद्वारेच दिले जाते. कमी पाण्यात, कमी काळात हे उत्पादन त्यांनी घेतले आहे.

यापूर्वी आम्ही याच पॉलिहाउसमध्ये फुलशेतीचा यशस्वी प्रयोग केला होता. या वेळेस ‘कलरफुल’ शिमला मिरचीचा (कॅपसिकम) प्रयोग करून बघितला. हा प्रयोगही यशस्वी झाला. पारंपरिक शेती व्यवसाय करण्यापेक्षा काहीतरी नवीन तंत्रज्ञान वापरून नवीन उत्पादन पद्धती विकसित केली पाहिजे. काहीवेळा नुकसानही सोसावे लागते. पण नवीन बाबी शिकता येतात. - सुजाता बागूल व डॉ. कमलाकर बागूल, प्रयोगशील दांपत्य, अभोणा

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची