Success Story : पोल्ट्रीतून आठ महिन्यांत मिळविले लाखांचे उत्पन्न; महिलेच्या कर्तृत्वाचे सर्वत्र कौतुक

मुखेड (नाशिक) : कुक्कुटपालन व्यवसायात आठ महिन्यांत दोन लाखांचे उत्पन्न मिळवणाऱ्या जळगाव नेऊर (ता. येवला) येथील महिला पोल्ट्री उद्योजक मनीषा कुऱ्हाडे यांचा शुक्रवारी (ता. २७) येवला पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते सत्कार झाला.

आठ महिन्यांत मिळविले दोन लाखांचे उत्पन्न

शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने जोडधंदा मिळाला पाहिजे, यादृष्टीने येवला पंचायत समिती पशुसंवर्धन विभागाकडून होतकरू शेतकरी, महिलांना कुक्कुटपालन, शेळीपालन, गायपालन व्यवसायास पाठबळ देण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत प्रवर्गनिहाय सबसिडी लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात आली. त्यात प्रामुख्याने कुक्कुटपालनमध्ये एक हजार पक्षी मर्यादा असलेल्या प्रकल्प शेडसाठी प्रस्तावित दोन लाख १२ हजार पाचशे रुपये किमतीला एससी, एसटी प्रवर्गास ७५ टक्के सबसिडी, तर इतर प्रवर्गासाठी ५० टक्के सबसिडीचा लाभ देण्यात आला. कुक्कुटपालनसाठी जळगाव नेऊर येथील महिला शेतकरी मनीषा कुऱ्हाडे, सायगाव येथील शेतकरी सुनील ढाकणे, सतीश खैरनार, शेळीपालनसाठी जळगाव नेऊर येथील सुधाकर त्रिभुवन यांना लाभ देण्यात आला.

एकूण सहा लाखांचे प्रशस्त शेड

पशुधन विकास अधिकारी डॉ. संजय नाशिककर, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रताप अनर्थे, श्री. बहिरम, बापूसाहेब वाघ, तुळशीराम कुऱ्हाडे, केदारनाथ कुऱ्हाडे, अरुण कुऱ्हाडे, पुष्पा कुऱ्हाडे, ज्योती कुऱ्हाडे, रुक्मिणी कुऱ्हाडे, बी. बी. आहेर आदी उपस्थित होते. जळगाव नेऊर येथील महिला पोल्ट्री उद्योजिका मनीषा कुऱ्हाडे यांनी मार्च २०२० मध्ये नावीन्यपूर्ण योजनेतून तुटपुंज्या अनुदानात भर टाकून एकूण सहा लाखांचे प्रशस्त शेड उभारले. मार्चमध्येच कोरोनाचे संकट आल्याने पहिला लॉट पूर्ण तोट्यात येऊनही मनीषा कुऱ्हाडे यांनी न डगमगता कुटुंबीयांच्या मदतीने कोरोनाचा सामना करत आठ महिन्यांत दोन लाखांचे उत्पन्न काढले.

हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली

प्रत्येक योजनेचा लाभ गरजू शेतकऱ्यांना देण्यासाठी पंचायत समिती कटिबद्ध असते. आज योजना कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात लाभार्थ्याने अनुदानाचा योग्य विनियोग केल्याचे समाधान आहे. - प्रवीण गायकवाड, सभापती

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार