Success Story : मालेगावच्या माळमाथ्यावर पिकविली खानदेशची केळी; मिळणार तिप्पट नफा

मालेगाव (नाशिक) : खानदेशचे प्रमुख फळपीक असलेली केळी मालेगावच्या माळमाथ्यावर फुलली आहे. तालुक्यातील टिंगरी येथील पाच शेतकऱ्यांनी २५ ते ३० एकरावर केळीचे पीक घेतले. बागलाण व येवल्यातील तुरळक शेतकऱ्यांनीही हा प्रयोग केला आहे. भरपूर पाणी व भारदस्त जमीन पिकासाठी आवश्‍यक आहे. फळपिकासाठी प्रसिद्ध असलेल्या कसमादेसह नाशिक जिल्ह्यात केळीच्या आगमानाने फळशेती करणाऱ्यांचा उत्साह वाढणार आहे. 

राजेंद्र जाधव यांचा यशस्वी प्रयोग

कसमादेतील शेतकरी प्रयोगशील आहेत. मका व कांदा हे प्रमुख पीक असले तरी डाळिंबासह विविध फळशेतीत या भागातील शेतकरी अग्रेसर आहेत. दशकापूर्वी डाळिंबाचे अधिराज्य होते. मर व तेल्या रोगामुळे डाळिंबाला घरघर लागली. परिणामी शेतकरी अन्य फळपिकांकडे वळले. यातून द्राक्ष, अंजीर, मोसंबी, पेरू, बोर, आंबा, सीताफळ, पपई आदींच्या फळबागा फुलल्या. केळीची लागवड प्रथमच माळमाथ्यावर झाली. टिंगरी येथील राजेंद्र जाधव व इतर शेतकऱ्यांनी तीन वर्षांपूर्वी अल्प प्रमाणात केळीचे पीक घेतले. ते यशस्वी झाल्याने त्यांनी पुन्हा फेब्रुवारी- २०२० मध्ये केळीची लागवड केली. यासाठी पंधरा रुपये नगाप्रमाणे रोप घेण्यात आले. लागवडीनंतर बारा महिन्यांत पीक येणार आहे. यानंतर पिकाचा दुसरा व तिसरा बहार प्रत्येकी नऊ महिन्यांत येईल. 

कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडून पाहणी 

केळी पिकाला मुबलक पाणी लागते. दोन वर्षांपासून कसमादे पट्ट्यात सरासरीच्या दीडशे ते दोनशे टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे भरपूर पाणी असून, पिकाला दिवसाआड पाणी दिले जात आहे. साधारणत: विक्री खर्च ५० ते ७५ हजार रुपये असून, उत्पादन किमान दोन लाखांपर्यंत अपेक्षित आहे. टिंगरी परिसरातील केळी लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. या भागात भारदस्त जमिनी मोठ्या प्रमाणावर आहेत. शिवाय पाण्यासाठी विहिरी, शेततळे, ठिबक सिंचन आदी सुविधा बहुसंख्य शेतकऱ्यांनी केल्या आहेत. इतर फळपिकांच्या तुलनेत केळीचा उत्पादन खर्च कमी असल्याचे जाणकारांचे मत आहे. कसमादेतील शेतकऱ्यांची प्रयोगशिलता पाहाता भविष्यात या भागात केळीच्या बागा फुलल्यास नवल वाटू नये. 

हेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?

डाळींबावरील तेल्या रोगामुळे बागा काढून टाकल्या. नवीन फळपीक शोधताना केळीचा प्रयोग केला. श्रीमंती जातीच्या केळीची लागवड केली. केळीचा प्रयोग यशस्वी झाला असून हळूहळू क्षेत्र वाढविण्याचा विचार आहे. आर्थिकदृष्ट्या परवडणारे हे पीक आहे. पुरेसे पाणी असल्यास या भागातील केळीची शेती यशस्वी होईल. - राजेंद्र जाधव शेतकरी, टिंगरी 

डाळींब हे कोरडवाहू पिक आहे. याउलट केळीचे पीक भारदस्त जमीनीत येते. हलक्या जमीनीत लागवड करु नये. मुबलक पाणी व भारदस्त जमीन असेल तर नाशिक जिल्ह्यातही केळी पिक फायदेशीर ठरु शकते. - दिलीप देवरे उपविभागीय कृषी अधिकारी  

हेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या