Success Story : युवा शेतकऱ्याने फुलविली दुष्काळी भागात स्ट्रॉबेरी! आज मिळवतोय लाखोंचे उत्पन्न

सिन्नर (जि.नाशिक) : सिन्नर तालुका दुष्काळातील छायेतील असल्याची अनेक वर्षांपासूनची ओळख आहे. कमी पर्जन्यमानामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. हे चित्र येणाऱ्या नव्या पिढीने बदलण्याचे ठरविले आहे. तालुक्यातील सोनांबे येथील अशाच एका नवीन प्रयोगशील युवा शेतकरी विकास पवार याने विज्ञान शाखेतील वनस्पतिशास्त्र पदवी घेतल्यानंतर पारंपरिक शेतीत बदल घडविण्याचा ध्यास घेतला.प्रतिकूल हवामानावर मात करत आज लाखोंचे उत्पन्नही मिळवत आहे. 

लॉकाडाउन काळात यशस्वी प्रयोग 

पदवी मिळाल्यानंतर कोरोनाच्या काळात लॉकडाउनमुळे घरी रिकामे न बसता विकासने शेतीकडे लक्ष दिले. स्ट्रॉबेरीचे आगार असलेल्या महाबळेश्वर येथील सर्कलवाडीचे प्रगतिशील शेतकरी विजय नन्नावरे यांच्याकडून सल्ला घेतला. सोनांबे येथे येऊन स्ट्रॉबेरीची लागवड करण्याचे निश्चित केले. नन्नावरे यांच्याकडून रोपेही उपलब्ध झाल्याने विकासचा उत्साह व आत्मविश्वास आणखीणच वाढला. पिकाच्या लागवडीच्या व्यवस्थापनाचा बारीक अभ्यास केल्यानंतर सप्टेंबरमध्ये लागवड केली. दोन महिन्यांनी हंगाम सुरू होतो, तो मार्चअखेर असतो. रोप वाढ, फुलोरा, फळधारणा व फळफुगवटा या गोष्टीचे योग्य नियोजन केले. आठवड्यातून तीन वेळा अन्नद्रव्याचा वापर, तसेच कीटकनाशकांची फवारणी केली. पीक हाताशी आल्यानंतर साधारण दिवसाआड तोडणी सुरू केली. प्रत्येक वेळी १५० ते २०० किलो उत्पादन मिळाल्याचे विकास पवार याने सांगितले. प्रतिकूल हवामानावर मात करत २५ गुंठे जमिनीत लाल स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड करून लाखोंचे उत्पन्नही मिळवत आहे. 

हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी 

प्रतिकूल हवामानावर मात करत आज लाखोंचे उत्पन्नही
सोनांबे हे घोटी रोडलगत असल्याने, तसेच समृद्धी महामार्गाचे कामही याच परिसरात सुरू असल्याने तेथील मोठ्या प्रमाणातील कामगारवर्ग थेट शेतात येऊन स्ट्रॉबेरीची खरेदी करतात. तसेच विक्रेतेही माल नेतात. नाशिक कृषी उत्पन्न बाजारातही विक्री केली. शंभर ते २५० प्रतिकिलो असा दर मिळाला. साधारण चार ते पाच महिन्यांच्या कालावधीत आपल्याला पाच ते सहा लाखांच्या आसपास उत्पन्न मिळाल्याचे विकास याने सांगितले. 

हेही वाचा - क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन

...असा आला खर्च 
मल्चिंग पेपर, खते, फवारणी, पॅकिंग बॉक्ससाठी एकूण एक लाख २५ हजारांचा खर्च आला. हंगामाच्या सुरवातीला प्रतिकिलोस २५० ते ३०० रुपये असा उच्चांकी दर मिळाला. तीन ते चार महिने उत्पादन सुरूच राहणार असून, पाच ते सहा टन उत्पादन अपेक्षित आहे. उत्पादनखर्च जाऊन तीन लाख रुपये नफा मिळेल. हवामान पोषक नसतानाही योग्य देखभाल, खतांची योग्य मात्रा या मुळे लालभडक फळे लागली, असे विकास पवार याने स्पष्ट केले.