Success Story : सलून सांभाळून युवा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग! प्रथमच बहरला ”काळा गहू”; पंचक्रोशीत नावलौकिक

अंबासन (जि.नाशिक) : सलून व्यवसाय व वडिलोपार्जित शेतीवर कुटुंबीयांसमवेत उदरनिर्वाह करणारे तसेच शेतीत वेगवेगळे प्रयोग करणारे युवा शेतकरी म्हणून पंचक्रोशीत त्यांचा नावलौकिक आहे. यंदा त्यांनी असा प्रयोग केला आहे. ज्याची गावागावात चर्चा आहे. 

युवा शेतकरी म्हणून पंचक्रोशीत नावलौकिक

नांदगाव वाके (ता. मालेगाव) येथील बाबूलाल पगारे सलून व्यवसाय व वडिलोपार्जित दीड एकर शेतीवर कुटुंबीयांसमवेत उदरनिर्वाह करीत आहेत. शेतीत वेगवेगळे प्रयोग करणारे युवा शेतकरी म्हणून पंचक्रोशीत त्यांचा नावलौकिक आहे. त्यांनी फेसबुकवर नीलेश शेडगे (श्रीरामपूर, जि. नगर) येथील शेतकऱ्याने पेरणी केलेल्या काळ्या गव्हावरील माहिती घेतली. आपणही शेतीत नवीन प्रयोग करावा म्हणून शेडगे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पंजाबमधील मोहाली येथील नॅशनल ॲग्री फूड बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटने संशोधित केलेले गहू (NABI MG) काळ्या गव्हाचे वाण आणून दिले. 

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा

काळा गहू घेण्यासाठी अनेकांकडून इच्छा

पगारे यांनी ३५ किलो काळ्या गव्हाचे बियाणे घेऊन २ नोव्हेंबर २०२० ला वीस गुंठ्ठ्यात सरी वरबा पद्धतीने पेरणी केली. आज या गव्हाची काढणी सुरू झाली असून, अनेकांनी अगोदरच काळा गहू घेण्यासाठी इच्छा व्यक्त केल्याचे बाबूलाल पगारे यांनी सांगितले. पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, झारखंड व छत्तीसगडला गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. 

हेही वाचा -  'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा

बहुतांश शेतकऱ्यांकडून पाहणी

सलून दुकान सांभाळून अल्पभूधारक युवा शेतकरी बाबूलाल पगारे यांनी वीस गुंठ्ठ्यात (नाबी एम जी) काळ्या गव्हाची लागवड केली आहे. कसमादे परिसरात प्रथमच काळ्या गव्हावरील लागवडीचा यशस्वी प्रयोग पाहण्यासाठी बहुतांश शेतकरी पगारे यांच्या शेतात भेट देऊन पाहणी करीत आहेत. 

 

मी दोन वर्षांपासून काळ्या गव्हाची लागवड करीत आहे. पंजाब येथील संशोधन संस्थेने याचे संशोधन केले आहे. पगारे यांनी फेसबुकवर माझ्याकडून माहिती घेतली होती. एकरी ३५ ते ४५ किलो बियाणे लागते. एकरी उत्पादन सुमारे १४ ते १८ क्विंटल मिळते. 
- नीलेश शेडगे, शेतकरी, श्रीरामपूर (जि. नगर) 

 

फेसबुक चाळत असताना शेडगे यांनी काळ्या गव्हावरील माहिती टाकलेली पाहिली आणि संपर्क केला. नवीन काहीतरी प्रयोग करावा म्हणून काळ्या गव्हाची लागवड करावी, असे वाटले. 
- बाबूलाल पगारे, अल्पभूधारक शेतकरी, नांदगाव वाके 

लागवड खर्च ः नांगरणी १५०० रुपये 
रोटर ः १००० रुपये 
बियाणे खर्च ः ३५ किलो ६० रुपयांप्रमाणे - २१०० रुपये 
सरी वरबा मजुरी ः ७०० रुपये 
तणनाशक ः ९० रुपये 
खत ः ६०० रुपये