Suhas Kande : नक्षल्यांकडून शिंदेंच्या हत्येचा कट, पण ‘मातोश्री’ने झेड प्लस नाकारली

सुहास कांदे,www,pudhari,news

मनमाड : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना नक्षलवादी संघटनांनी त्यांची हत्या करण्याचा कट रचला होता. याचा सुगावा आयबी, एसआयडी, सीबीआय यांना लागताच त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा अहवाल राज्य सरकारला दिला. परंतु शिंदे यांना अशा प्रकारची सुरक्षा देऊ नये, असा फोन मातोश्रीवरून तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांना आला आणि त्यांना झेड प्लस सुरक्षा नाकारण्यात आली, असा खळबळजनक दावा आमदार सुहास कांदे यांनी येथे केला.

आदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद यात्रेनिमित्त मेळावा सुरू असताना आमदार सुहास कांदे यांनी शुक्रवारी (दि. 22) स्वतंत्र मेळावा घेत शक्तिप्रदर्शन केले. शिंदे यांना मारण्याची सुपारी देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट या मेळाव्यात कांदे यांनी केला. शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना नक्षल्यांनी शिंदे यांच्या सांगण्यावरून आत्मसमर्पण केेले. त्यानंतर पोलिसांनी अनेकांचे एन्काउंटर केले. शिंदे यांनी सगळ्या पोलिसांना दहा लाख रुपये बक्षीस दिले. त्यानंतर नक्षलवाद्यांच्या विविध संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी शिंदे यांचा खून करायचे ठरविले. नक्षलवादी ठाण्यातही आले होते.

कांदे यांनी शिंदे यांना मुख्यमंत्रिपद कसे नाकारण्यात आले, याचाही गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली. शिंदे हेच आघाडी सरकारचे मुख्यमंत्री होणार होते. परंतु शेवटच्या क्षणी शरद पवार उद्धव ठाकरे यांना बाजूला घेऊन गेले आणि त्यांनी ठाकरे यांनाच मुख्यमंत्री होण्याचा आग्रह धरला आणि शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद हुकले. राज्याची अर्थ नाडी असणारे अर्थमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे आले आणि नंतर निधीवाटपाचे प्रश्न निर्माण झाले. अशा रीतीने शिंदे यांच्यावर अन्याय होत गेला. सरकार पाडण्यासाठी बंडाला सुरुवात करणारे जे चार जण सर्वांत आघाडीवर होेते, त्यात शिंदेंसोबत मी पण होतो आणि मी हे आपणास छाती ठोकून सांगतो, असा दावा कांदे यांनी केला.

‘आम्ही गद्दार नव्हे, उठाव केला’ :

आम्ही कधीही शिवसेना सोडली नाही आणि सोडणारही नाही. आजही मातोश्री माझ्यासाठी पंढरी आहे, तर हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब देव आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आम्ही माउलीच म्हणतो, तर आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आजही कमालीचा आदर आहे. पण आपण आम्हाला गद्दार म्हणू नका कारण आम्ही गद्दारी केली नाही, तर आम्ही उठाव केल्याचे प्रतिपादन आमदार सुहास कांदे यांनी केले. येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी सभापती विलास आहेर, राजभाऊ देशमुख, राजेंद्र भाबड, बाळासाहेब आव्हाड, किशोर लहाने, अंकुश कातकडे, अंजुम कांदे, माजी नगरसेविका संगीता बागूल, विद्या जगताप, भाजपचे शहराध्यक्ष जय फुलवाणी, आरपीआयचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र आहिरे, माजी नगरसेवक गंगाभाऊ त्रिभुवन यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यकर्त्यांना संबोधित करताना आ. कांदे पुढे म्हणाले की, उठाव का केला, याची माहिती तुम्हाला देण्यासाठी हा मेळावा घेतला. आघाडी सरकार बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारधारेच्या विरोधात होते. या सरकारमध्ये मुंबई बॉम्बस्फोट घडविणार्‍यांसोबत संबंध ठेवणारे लोक मंत्रिपदावर होते. शिवसेना हिंदुत्वापासून दूर चालली होती. शिवसेना संपविण्यासाठी प्रयत्न सुरू होते, असा दावा कांदे यांनी केला. राजाभाऊ देशमुख यांनी सूत्रसंचालन, तर संयोजन किरण देवरे, फरहान खान, सुनील हांडगे, प्रमोद भाबड, मुन्ना दरगुडे, गालिब शेख, अमजद पठाण, राकेश ललवाणी, मुकेश ललवाणी, विकास वाघ, नेहा जगताप, पूजा छाजेड, योगेश इमले आदींनी केले होते.

The post Suhas Kande : नक्षल्यांकडून शिंदेंच्या हत्येचा कट, पण ‘मातोश्री’ने झेड प्लस नाकारली appeared first on पुढारी.