Suicide : आधी प्रेम केलं, नंतर बदनामीची धमकी ; जळगावात तरुणीची आत्महत्या

गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
लग्नाचे आमिष दाखवून वारंवार दिशाभूल करत छायाचित्र आणि कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी दिल्याने 21 वर्षीय युवतीने गळफास घेतला आहे. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान बुधवारी (दि. 13) तिची प्राणज्योत मालविली. युवतीच्या नातेवाइकांनी संबंधित तरुणासह त्याच्या आईलाही अटक करण्याची मागणी करत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले आहे.

दिव्या दिलीप जाधव (21, तारखेडा, पाचोरा) हिची गावातीलच नीलेश मंगलसिंग गायकवाड याच्यासोबत ओळख निर्माण झाली. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार दिशाभूल केली. गेल्या दोन वर्षांपासून लग्न केले नसल्याने कोणताही खुलासा नीलेश देत नव्हता. एकाच समाजाचे असल्याने मुलासह त्याची आई लक्ष्मीबाई यांना समजावून लग्न करण्याविषयी नातेवाइकांनी सांगितले. मात्र, अश्लील भाषा वापरून त्यांनी थेट लग्नास मनाई केली. दिव्याचे आई-वडील शेतात कामाला गेल्यानंतर पुन्हा नीलेशने दिव्याला वारंवार फोन व व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग करत तिला धमकी दिली. हा प्रकार गेले काही दिवस सुरू होता.

नीलेशकडून वारंवार होणार्‍या त्रासाला कंटाळून दिव्याने दि.24 जून रोजी राहत्या घरात गळफास घेतला. त्यामुळे नातेवाइकांनी दिव्याला तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविले. बुधवारी (दि.13) सकाळी 11 च्या सुमारास उपचार सुरू असतांना दिव्या मृत्यू पावली. दिव्याच्या मृत्यूस नीलेश आणि त्याची आई लक्ष्मीबाई जबाबदार असल्याने त्यांना अटक करा, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा दिव्याच्या नातेवाइकांनी घेतला आहे. या घटनेने परिसरातील वातावरण काही काळ तणावाचे झाले होते.

हेही वाचा :

The post Suicide : आधी प्रेम केलं, नंतर बदनामीची धमकी ; जळगावात तरुणीची आत्महत्या appeared first on पुढारी.