Sushma Andhare : सत्तेत असतानाही सुरक्षा घ्यावी लागते, यातच शिवसेनेची ताकद

सुषमा अंधारे

जळगाव : शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare)  या महाप्रबोधन यात्रेनिमित्त जिल्हा दौऱ्यावर आल्या आहेत. शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना त्यांनी बंडखोरांचा खरपूस समाचार घेतला. जळगाव जिल्ह्यातील पाच आमदार शिंदे गटात गेले म्हणून जिल्ह्यात शिवसेनेची ताकद कमी झाली असं नाही. सत्ता असतानाही यांना वाय प्लस सुरक्षा घेवून फिराव लागतं आहे. यातच काय ते उत्तर आलं, असं म्हणतं जळगावमध्ये शिवसेनेची ताकद अद्याप कायम असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला.

महाप्रबोधन यात्रेतील दुसऱ्या टप्प्यासाठी उपनेत्या अंधारे या मंगळवारी जिल्ह्यात आल्या. याअनुषंगाने जळगावात त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. अंधारे म्हणाल्या की, मी वारंवार सांगत आहे, आमच्याकडे आमदारांमुळे शिवसैनिक नसतात, तर शिवसैनिकांमुळे आमदार असतात. त्यामुळे जिल्ह्यातील पाच आमदार गेले असले आणि त्यांच्यासोबत काही टेंडर, गुत्तेदारीच्या राजकारणातले काही लोक गेले असले, तरी याचा अर्थ जळगावमध्ये शिवसेनेची क्षती झाली असे आम्हाला अजिबात वाटत नाही. कारण, जळगावमध्ये जोपर्यंत इथले सर्वसामान्य शिवसैनिक तग धरून निष्ठेने उभे आहेत, तोपर्यंत आम्हाला चिंता करण्याची गरजच नाही.

३० वर्ष सत्तेच्या जोरावर मलिदा खाल्ला…

सुषमा अंधारे (Sushma Andhare)  यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या टीकेवर उत्तर दिलं. सुषमा अंधारे या तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेत आलेलं बाळ आहे, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली होती. त्यावर बोलताना त्या म्हणाल्या, मी जर तीन महिन्यांचं बाळ असेल तर बाळ केस ओढतं, बाळ आपल्या मोठ्या भावाच्या गालाव चापट्या मारतं, बाळ लाथा झाडतं, कारण बाळाला काहीही करायचा अधिकार आहे. एकदाही आम्ही उध्दव ठाकरे यांचा हात कधी सोडला नाही. पण गुलाबभाऊ ३० वर्ष सत्तेच्या जोरावर मलिदा खाल्ला तरी तुम्हाला पाझर का फुटत नाही, असा खोचक सवालही सुषमा अंधारे यांनी केला.

महाराष्ट्राला कंगाल करण्याचं काम…

सर्व प्रकल्प गुजरातमध्ये नेत आहेत. महाराष्ट्राला कंगाल करण्याचं काम सुरू आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे, मात्र मुंबई व सिंधुदुर्ग महाराष्ट्रपासून वेगळं करण्याचा भाजपचा कुटील डाव आहे. यात एकनाथ शिंदे अळीमिळी चूप करून बसले आहेत, याच वाईट वाटतं आहे. मुंबई महापालिका निवडणूक असो की आगामी निवडणुका. यासाठी सत्ताधाऱ्यांकडून दबाव तंत्र वापरले जात आहे. या दबाव तंत्राच्या विरोधात प्रत्येक शिवसैनिक हा हातात मशाल घेऊन पेटून उठलेला आहे. कुठल्याही दबाव तंत्राला बळी न पडता उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी ठामपणे विरोधात उभी आहे. किशोरीताई पेडणेकर असतील किंवा इतर अशा सर्वांवर दबाव तंत्र वापरण्याचं काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. तुम्ही अस टार्गेट टार्गेटचा खेळ खेळत रहा, २०२४ च्या निवडणुकीत जनता तुम्हाला टार्गेट दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धारही सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

 

The post Sushma Andhare : सत्तेत असतानाही सुरक्षा घ्यावी लागते, यातच शिवसेनेची ताकद appeared first on पुढारी.