Site icon

Tiger News : चंद्रपूरचे वाघोबा नाशिक मुक्कामी; समृध्दी महामार्गाने स्वारी

नाशिक : नितीन रणशूर
गेल्या काही वर्षांमध्ये चंद्रपूर जिल्हा वाघांचे माहेरघर बनला असून, मानवासह पशुधनावर वाघांच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. नवीन वर्षात चंद्रपूर वनविभागाने दोन वाघ जेरबंद केले होते. त्यात एका नर, तर एका मादीचा समावेश आहे. बुधवारी (दि.११) सायंकाळी नागपूर येथून या वाघांच्या जोडीची स्वारी समृध्दी महामार्गाने बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या दिशेने निघाली होती. गुरुवारी (दि.१२) पहाटे ही जोडी विश्रांतीसाठी नाशिकमध्ये आली होती. वनविभागाच्या विश्रामगृहात तब्बल सहा तासांच्या मुक्कामानंतर चंद्रपूरचे दोन्ही वाघोबा बोरिवलीच्या दिशेने रवाना झाले.

गेल्या वर्षाभरात चंद्रपूरमध्ये वाघांच्या हल्ल्यात तब्बल ५३ ग्रामस्थ ठार झाले आहेत. ब्रह्मपुरी, सावली, चितपल्ली या परिसरात वाघांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. वाघांच्या वाढत्या हल्ल्यांची गांभीर्यता लक्षात घेत, वाघांना जेरबंद करण्याचा निर्णय चंद्रपूर वनविभागाने घेतला आहे. नववर्षात वनविभागाला दोन वाघ जेरबंद करण्यात यश आले होते. या वाघ-वाघिणीची जोडीला पिंजऱ्यात ठेवण्यासाठी चंद्रपूर ट्रान्झिट सेंटरमध्ये जागा अपुरी पडू लागल्याने त्यांना नागपुरातील गोरेवाडा बचाव केंद्रात हलविण्यात आले होते.

गोरेवाडा बचाव केंद्रात १५ पिंजऱ्यांची क्षमता असून, या जोडीमुळे हा आकडा १९ वर गेला होता. त्यामुळे नुकतेच जेरबंद केलेल्या वाघ-वाघिणीची रवानगी बोरिवलीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात करण्याचा निर्णय प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) माहिप गुप्ता यांनी घेतला. त्यानुसार सिंह आणि व्याघ्र विहार उद्यानचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बारब्दे यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल बनगर तसेच वन्य प्राणी बचाव पथकातील सदस्य वैभव पाटील, संदीप गायकवाड, प्रशांत टोकरे, गोपाळ गिंबल, अनिल सापटे आदी बुधवारी (दि.११) नागपूरमध्ये दाखल झाले होते. वैदयकीय तपासणीनंतर दोन्ही वाघांचा बोरिवलीच्या दिशेने प्रवास सुरू झाला होता.

असा झाला प्रवास

बुधवारी (दि.११) सायंकाळी नागपूरमधून वाघांची जोडी रेस्क्यू रुग्णवाहिका बोरिवलीच्या दिशेने मार्गस्थ झाली. साधारणत: प्रती १०० किलोमीटरवर रुग्णवाहिका थांबवून वाघोबांना १५ ते २० मिनिटे विश्रांती देण्यात आली. यादरम्यान पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी झाल्यानंतर वाघांना आवश्यकतेनुसार पाणी दिले जात होते. गुरुवारी (दि.१२) पहाटे ३.४५ च्या सुमारास ही जोडी नाशिकमध्ये दाखल झाली. नाशिकचे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल अहिरराव यांनी पाहुण्यांची खास व्यवस्था केली होती. सकाळी १०.३० वाजता नाशिकमधून जोडीसह निघालेले वनविभागाचे पथक मुंबईला दुपारी २.३० वाजता पोहोचले.
कोट

समृद्धी महामार्गाने विदर्भातून मुंबईत दाखल होणारी ही पहिलीच वाघांची जोडी आहे. प्रवासाचा टप्पा मोठा असल्याने विशेष खबरदारी घेण्यात आली होती. वाघ असलेल्या रेस्क्यू रुग्णवाहिकेच्या दिमतीला वनविभागाचे एक वाहन हाेते. तसेच खबरदारी म्हणून औषधे आणि डॉक्टर्सदेखील वाहनात होते. त्यामुळे वाघाची जोडी सुखरूप बोरिवलीला पोहोचली.
– विजय बारब्दे, वनपरिक्षेत्र अधिकारी

सिंह आणि व्याघ्र विहार उद्यान,

हेही वाचा :

The post Tiger News : चंद्रपूरचे वाघोबा नाशिक मुक्कामी; समृध्दी महामार्गाने स्वारी appeared first on पुढारी.

Exit mobile version