Trimbakeshwar Temple : आंदोलकांच्या गर्दीने त्र्यंबकमध्ये दर्शनाचे तीनतेरा

त्र्यंबकेश्वर मंदिर,www.pudhari.news

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर मंदिरात कथित प्रवेशावरून राज्यभरातील विविध संघटनांच्या नेत्यांची आंदोलने तसेच व्हीआयपींच्या महाआरतीमुळे देशभरातून हजारो रुपये खर्चून आलेल्या भाविकांच्या दर्शनाचे गेल्या पंधरा दिवसांत अक्षरश: तीनतेरा वाजले आहेत. भाविकांना दर्शनाविना परतावे लागत असल्याने अनेक भाविकांनी त्र्यंबकेश्वरमधील दर्शन स्थितीविषयी संताप व्यक्त केला आहे.

कथित प्रवेशाच्या मुद्यावरून त्र्यंबकेश्वर मंदिरात विविध संघटनांचा राबता सुरू झाला आहे. मंगळवारी अतिरिक्त पोलिस महासंचालक यांनी पाहणी दौरा केला, तर शुक्रवारी एसआयटी समितीने पाहणी केली. त्याचा थेट परिणाम उत्तर दरवाजाने आत बाहेर जाणाऱ्या हजारो भाविकांना सोसावा लागत आहे. आंदोलनावेळी हजारो किलोमीटर अंतरावरून आलेल्या भाविकांना दर्शनासाठी प्रतीक्षा करावी लागली. असंख्य भाविकांना मंदिराबाहेर आल्यानंतर नाराजी व्यक्त केली.

आंदोलन करणाऱ्या नेत्यांसमवेत त्यांचे कार्यकर्ते बिनदिक्क्त मंदिरात घुसत असून, सुरक्षारक्षकांना बघ्याची भूमिका घ्यावी लागत आहे. गेल्या आठ दिवसांपासून देवस्थान ट्रस्ट प्रशासनाने याबाबत कोणीतीही दखल घेतली नाही. महाआरतीवेळी तर मंदिरातील दर्शनव्यवस्था पुरती बंद पडल्याने भाविकांना माघारी परतावे लागले. महाआरतीवेळी 200 रुपये तिकीट घेऊन मंदिरात दर्शनासाठी उभ्या असलेल्या भाविकांना तब्बल दोन तास रस्त्यावर उन्हात थांबावे लागले. अनेकांना तर थेट बाहेरचा रस्ता दाखवला गेला. स्थानिकांचीही मंदिरात प्रवेशावेळी अडवणूक होत असल्याने ते या प्रकाराने संतप्त झाले आहेत. मंदिराच्या विश्वस्तांनी आतातरी सीसीटीव्ही पाहून परिस्थितीची दखल घ्यावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी करत आहेत. आता आंदोलन बास झाले, अशी बोलकी प्रतिक्रिया स्थानिक व्यक्त करत आहेत.

हेही वाचा :

The post Trimbakeshwar Temple : आंदोलकांच्या गर्दीने त्र्यंबकमध्ये दर्शनाचे तीनतेरा appeared first on पुढारी.