नाशिक : "वारे सरकार तेरा खेल, सोने के दाम में मिलता तेल", "मोदी सरकार हाय हाय" अशा घोषणा देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे व जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढी विरोधात दुचाकी ढकलत आंदोलन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना निवेदन देण्यात आले.
नाशिक : राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सोमवारी (ता. 11) पेट्रोल, डिझेल दरवाढ आणि महागाईविरोधात व केंद्र सरकारच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. यावेळी जुने बसस्थानक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोटारसायकली ढकलत आणण्यात आल्या.
(व्हिडिओ : सोमनाथ कोकरे)#sakal #nashik pic.twitter.com/9wPGm8GlIe
— Sakal Nashik (@SakalNashik) January 11, 2021
इंधन दरवाढीच्या माध्यमातून लूट..
केंद्र सरकारच्या धोरणामुळे महागाई वाढत असून भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ढासळत आहे. दरम्यान देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्नाने निच्चांक पातळी गाठली आहे. केंद्र सरकारच्या दुर्लक्षामुळे व वायफळ खर्चामुळे कोरोनाचा शिरकाव होण्याअगोदरच ही परिस्थिती उद्भवली असून कोरोना महामारीचे निमित्त झाले आहे. इंधन दराची घौडदौड सुरूच असून घरगुती गॅसचे दर सर्वसामान्य जनतेला परवडणारे नाहीत. पेट्रोल आणि डिझेलच्या दराने सर्वोच्च पातळी गाठली आहे. दिवसागणिक इंधन दरवाढ होत असून त्याचबरोबर महागाईत वाढ होत आहे. लॉकडाउनच्या काळात जून महिन्यात वीसहून अधिकवेळा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली होती, इंधन दरवाढीच्या माध्यमातून लूट करून देश चालवण्याचे तंत्र केंद्र सरकारने विकसित केले आहे. लॉकडाउनच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीत घट होत असतांना देखील भारतात इंधनाचे दर वाढत होते असा आरोप यावेळी करण्यात आला.
हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार
अर्थतज्ञांचे मार्गदर्शन घेत उपाययोजना कराव्यात
तसेच निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यात, केंद्र सरकारच्या सुलतानी वृत्तीमुळे जगाचा पोशिंदा शेतकरी कधी नव्हे ते आंदोलन करत आहे. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला असून कडधान्य व डाळींसह भाजीपाल्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. खाद्यतेलांच्या किमती भरमसाठ वाढल्या असून गृहिणींना घर चालविणे मुश्कील झाले आहे. महागाई रोखण्यासाठी अर्थतज्ञांचे मार्गदर्शन घेऊन तातडीने उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच पेट्रोल व डीझेलवरील सेस कमी करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.प्रदेश उपाध्यक्ष सचिन पिंगळे, चेतन कासव, प्रफुल्ल पवार, बाळा निगळ, शामराव हिरे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप