VIDEO : ईगतपुरीत दिसला वाघ? जिकडे-तिकडे व्हिडिओ व्हायरल; मात्र सत्य काही निराळेच

सिडको (नाशिक) : "बिबट्या" पाठोपाठ नाशिक जिल्ह्यात आता "वाघा"चे ही दर्शन होत असल्याची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. वाघ दिसल्याचे समजताच जो तो व्हिडिओ फॉरवर्ड करत सुटला. अक्षरश: नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. अन् सत्य निघाले काही निराळेच...वाचा नेमका काय आहे प्रकार?

...अन् व्हायरल झाला व्हिडिओ

जिल्ह्यात सध्या बिबट्या पाठोपाठ वाघही असल्याची चर्चा जोर धरू लागली. यासंदर्भात वाघ अन् तिचे तीन पिल्ले दिसत असलेला व्हिडिओ जाम व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रात्रीच्या वेळेला एक वाघीण व तिच्या सोबत दोन बछडे फिरत असल्याचा व्हिडिओ बघायला मिळाला. मागील अनेक वर्षांपासून नाशिक जिल्ह्यात व शहरात केवळ आणि केवळ फक्त बिबट्याचेच दर्शन होत असल्याचे ऐकायला मिळत होते व तसे आहे देखील! परंतु त्या पाठोपाठ इगतपुरी तालुक्यातील कावनई क्षेत्राजवळ वाघ व तिचे दोन बछडे रात्रीचे वेळी फिरत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होताच नागरिकांत भीती निर्माण झाली.

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

वनविभागाचे अधिकारी म्हणतात...

यासंदर्भात वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी सदर वृत्त खात्रीलायक नसल्याचे स्पष्ट केले आहे. यासंदर्भात जमल्यास चौकशी करू असेही त्यांचे म्हणणे आहे. परंतु आपल्या या भागामध्ये अद्यापपर्यंत कधीही वाघाचे दर्शन झालेले नाही. त्यामुळे हा व्हिडीओ आपल्या नाशिक जिल्ह्याचा नसून ज्या ठिकाणी वाघ असेल त्या ठिकाणाचा असल्याचे वन अधिकारी भदाणे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे 'अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, घाबरून जाऊ नये' असे आवाहन त्यांनी "सकाळ"च्या माध्यमातून केले आहे.