VIDEO : कोरोनाची ऐशीतैशी, चित्रपट महत्वाचा! मालेगावकरांकडून सिनेमागृहाबाहेर लापरवाहीची हद्द पार

मालेगाव (जि.नाशिक) : शहरात अवघ्या दहा दिवसात कोरोनाचे हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. सध्या ॲक्टीव रुग्णांची संख्या हजाराच्या उंबरठ्यावर आहे. नागरिकांच्या बेफिकीरी वृत्तीमुळे शहर व तालुक्यात झपाट्याने रुग्णसंख्या वाढत असतानाच काल शुक्रवार आठवडे बाजार सुटीचा दिवस असल्याने येथील मोहन सिनेमागृहात नव्याने प्रदर्शित झालेल्या ‘मुंबई सागा’ या चित्रपटाच्या निमित्ताने कोरोनाची ऐशीतैसी झाली. इथल्या सिनेमागृहाबाहेरच्या परिस्थितीचा VIDEO व्हायरल झाल्याने अनेकांनी धडकी भरली आहे. 

मोहन सिनेमागृहात कोरोनाची ऐशीतैसी

शहरातील चित्रपटगृहात फटाके फोडणे, अभिनेत्याला दहीहंडी करुन हार घालणे नवीन नाही. कोरोनाचा संसर्ग फोफावला असतानाही यात तसूभरही फरक पडलेला नाही. अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर जॉन अब्राहम, हिमेश रेशमिया या अभिनेत्यांचा मुंबई सागा हा चित्रपट झळकताच मोहन सिनेमागृहात झुंबड उडाली.

 

विशेष म्हणजे रात्री उशिराचा खेळही सुरु होता. 50 टक्के प्रेक्षक संख्येची मर्यादा हा विषयच नव्हता. मोहन सिनेमागृहातील गोंधळा संदर्भात सायंकाळपर्यंत छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा मात्र दाखल झालेला नव्हता. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. सायंकाळच्या खेळाला प्रेक्षकांनी तुफान गर्दी करतानाच सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. सिनेमागृहात प्रवेश मिळविण्यासाठी एकमेकांच्या खांद्यावर चढून मालेगाव स्टाईल्सची पुन्हा एकदा प्रचिती दिली. 

हेही वाचा -  नाशिकमध्ये आता कोरोनाचा युरोपियन स्ट्रेनचे संकट; काय आहे हा बी.१.१.७ स्ट्रेन? डॉक्टरांची माहिती

गेल्या तीन दिवसापासून रुग्णांमध्ये वाढ
शहरात दोन दिवसीय लॉकडाऊनच्या शनिवारी (ता.20) पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र जीवनावश्‍यक वस्तूंच्या दुकानांवर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. दुध डेअरी, भाजीपाला दुकानांवरची गर्दी कोरोना वाढीस कारणीभूत ठरु शकेल. शहरातील कॅम्प -संगमेश्‍वरच्या पश्‍चिम पट्ट्यात शंभर टक्के दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. पुर्व भागातील 70 टक्के दुकाने बंद होती. किरकोळ अपवाद वगळता शहरात कोरोना निर्बंधांना चांगला प्रतिसाद मिळाला. जीवनावश्‍यक वस्तुंची दुकाने सुरु होती. मात्र या दुकानांवरदेखील सायंकाळी मोठी गर्दी होती. महापालिका हद्दीत गेल्या तीन दिवसापासून दीडशेपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा
रस्त्यांवरची गर्दी कायम
एकीकडे रुग्णसंख्या वाढत असतानाच नियमांचे कोठेही पालन होतांना दिसत नाही. विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांनी दोन दिवस कारवाई केली. महापालिका आणि पोलिसांचे संयुक्त पथक कोठेच आढळून येत नाही. दोन दिवसीय लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी दुकाने, प्रतिष्ठाने बंद असली तरी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी कायम आहे. तरुणांच्या झुंडी दिवसभर फिरत होत्या. मोटारसायकल व इतर वाहनांची गर्दी कायम होती. नागरीक विनाकारण घराबाहेर फिरत असल्याने कोरोना निर्बंधांचे येथे जेमतेम 50 टक्केच पालन होत आहे.