VIDEO : ड्रेनेजच्या २० फूट खड्ड्यात दबलेले दोघे कामगार बचावले; तब्बल दोन तासांच्या प्रयत्नांनंतर यश

नाशिक रोड : विहितगाव-वडनेर दुमाला रस्त्यावर महापालिकेचे भूमिगत गटारीचे पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. येथील खड्ड्यांमध्ये पाइप फिटिंग करत असताना दोन कामगारांवर माती पडून ते ढिगाराखाली दबले गेल्याची घटना घडली

नेमके काय घडले?

गेल्या काही दिवसांपासून प्रभाग २२ मध्ये विहितगाव-वडनेरदुमाला रोडवर महापालिकेचे भूमिगत गटारीचे पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. गुरुवारी (ता. ११) सकाळी अकराच्या सुमारास पप्पू रामदास आंबोरे (सिडको) व मंगेश सुभाष गवारे (चांदोरी) हे कामगार पाइप फिटिंग काम करत असताना अचानक २० फूट खड्ड्यात आजूबाजूला असलेली माती दोघांच्या अंगावर पडली व ते बुजले गेले.हे इतर कामगारांच्या लक्षात आले. नगरसेवक केशव पोरजे यांनी अग्निशमन दलाला त्वरित माहिती दिली. घटनास्थळी त्वरित अग्निशमन दल दाखल होऊन त्यांनी दोन कामगारांना मातीच्या ढिगाऱ्याखालून काढून जीव वाचविला. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट 

तब्बल दोन तासांनंतर यश

इतर कामगारांनी नगरसेवक केशव पोरजे व अग्निशामक दलाशी संपर्क साधला. अग्निशामक कर्मचारी व नगरसेवक पोरजे घटनास्थळी दाखल झाले. कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. सुमारे दोन तासांनंतर त्यांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र, तेव्हा दोघे कामगार बेशुद्ध होते. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांची तब्येत स्थिर असल्याचे समजते. अग्निशामक अधिकारी ए. वाय. जाधव, आर. बी. जाधव, श्‍याम काळे, उमेश गोडसे, प्रकाश कडक, बाजीराव कापसे, संजय पगारे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी प्रयत्न केले. 

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी