VIDEO : नाशिकच्या न्यायालयातील स्टेशनरी इमारतीला आग; बहुतांश फाईल्स आणि रेकॉर्ड जळून खाक

नाशिक : जिल्हा न्यायालयाच्या आवारात जुनी स्टेशनरी ठेवण्याच्या जुन्या इमारतीला गुरुवारी (ता. १) दुपारी आग लागून काही जुने स्टेशनरी साहित्य खाक झाले. तातडीने महापालिकेच्या दोन बंबांद्वारे आग विझविण्यात यश आले. आगीत जीवित किंवा वित्तहानीचे वृत्त नाही. दरम्यान, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सकृद्ददर्शनी पुढे आले आहे. 

 

न्यायालयाच्या मागील बाजूच्या बिल्डिंग दोनशेजारील न्यायालयातील अडगळीचे स्टेशनरीचे साहित्य ठेवलेल्या कौलारू इमारतीतून धूर निघू लागल्याने हा प्रकार लक्षात आला. त्यावर तातडीने महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या बंबाला पाचारण करण्यात आले. दोन बंबानी आग आटोक्यात आणली. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित विजेचे कनेक्शन बंद केले. आगीत जळालेल्या जुन्या रेकॉर्डच्या फायली, पावतीपुस्तक, इतर स्टेशनरी साहित्याच्या पेट्या, खोके बाहेर काढण्यात आले. दुपारी पोलिस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना, वरिष्ठ 
निरीक्षक हेमंत सोमवंशी आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आग लागलेली इमारत जुनी असून, मारुती बिल्डिंग दोनशेजारी कौलारू इमारतीत बेलीफ कक्षाशेजारी दोन खोल्यांत ही स्टेशनरी ठेवली आहे. आगीनंतर काही वेळातच परिसरात मोठा धूर झाल्याने कौलारुरू इमारतीतील काही 
भागाची कौले काढून आत पाणी मारून आग विझविण्यात आली. दुपारनंतर आगीत जळालेली स्टेशनरी आणि इतर साहित्य अलग करण्याचे काम सुरू होते. 

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण