VIDEO : पर्यावरणसंवर्धनासाठी शेतकरी कन्येचे महाराष्ट्र भ्रमण; आतापर्यंत ६ हजारांहून अधिक किलोमीटरचा प्रवास

नाशिक  : यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील २१ वर्षीय शेतकऱ्याची मुलगी प्रणाली चिकटे पर्यावरणसंवर्धनासाठी महाराष्ट्र भ्रमंतीसाठी सायकलवरून निघाली असून, गुरुवारी (ता. ११) सायंकाळी प्रणालीचे नाशिक शहरात आगमन झाले. सायकलने महाराष्ट्र भ्रमंती करताना आतापर्यंत प्रणालीला पर्यावरणरक्षणासाठी विविध प्रकारचे अनुभव येत आहेत. प्रणालीने चंद्रपूरमधून बीएसडब्ल्यूचे शिक्षण घेतले असून, सायकलने महाराष्ट्र भ्रमंती ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचा मानस असल्याचे प्रणालीने सांगितले. 

 

प्रणालीचा गुरुवारी होता १४३ वा दिवस

पर्यावरणसंवर्धनाचा विषय घेऊन निघालेल्या प्रणालीने सायकलवरून आतापर्यंत सहा हजारांहून अधिक किलोमीटरचा प्रवास केला आहे. २० ऑक्टोबरपासून निघालेल्या प्रणालीचा गुरुवारी १४३ वा दिवस होता. सायकल भ्रमंतीचे कोणतेच नियोजन नसल्याचे प्रणालीने सांगितले. सायकलने सलग चार महिन्यांपासून प्रवास सुरू असून, प्रत्येक गावांना भेटी देत पर्यावरणसंवर्धनाबाबत जनजागृती केली जात आहे. प्रवासादरम्यान शहरी, ग्रामीण, आदिवासी भागांना भेटी दिल्या असून, त्या भागातील नागरिकांशी चर्चा करून तेथील परिस्थिती जाणून घेत पर्यावरणसंवर्धनाचा अभ्यासही करत आहे. प्रवासात नद्यांचे प्रदूषण जाणवत असून, प्रणालीचा सायकल प्रवास इतर मुलींसाठी प्रेरणादायी ठरला आहे. आतापर्यंतच्या प्रवासात चांगले अनुभव आले असून, लोकांची साथ मिळाल्यामुळेच १४३ दिवसांपासून प्रवास करत असल्याचे प्रणालीने सांगितले. पाण्याची बाटली प्लॅस्टिकमध्ये येत असल्यामुळे गावात पोचल्यानंतरच प्रणालीने पाणी घेतले आहे. रोज ८० ते १०० किलोमीटरचा प्रवास करत असून, प्रवासात नंदुरबारमध्ये आरोग्याबाबत त्रास झाला मात्र एकही गोळी लागली नाही असेही तिने सांगीतले. 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

घरात तीन बहिणी, आई-वडील शेतकरी आणि विदर्भात असलेला दुष्काळ, त्यात कर्जबाजारीपणाच्या स्थितीमुळे कमीत कमी गरजांमध्ये जगण्याचा प्रयत्न करत आहे. घरातून मिळालेला आधार, आत्मविश्‍वासाची शिदोरी घेऊन महाराष्ट्र भ्रमंती करत असून, प्रवासात लोकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. 
-प्रणाली चिकटे 

आतापर्यंतचा असा आहे प्रवास 
विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा खानदेशातील जळगाव, अमळनेर, नंदुरबार, धुळे असा प्रवास करून गुरुवारी मालेगाववरून नाशिकमध्ये आली आहे. पुढील प्रवास पालघरमार्गे कोकणात असल्याचे प्रणालीने सांगितले. 
 
आदर्श गाव बारीपाड्याला भेट 
धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील आदर्श गाव बारीपाड्याला भेट दिली असून, नंदुरबार तालुक्यात मेधा पाटकरांसोबत बालमेळाव्यात पर्यावरणसंवर्धनासंदर्भात प्रणालीने जनजागृती केली आहे. 

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO