Video : मनमाडकरांनी अनुभवली धुक्याची दुलई; संपूर्ण शहरच हरवले धुक्यात 

मनमाड (नाशिक) : मनमाडकरांची आज (ता १५) पहाट दाट धुक्यानेच उजाडली. घराबाहेर पडल्यानंतर अगदी फुटाच्या अंतरावर देखील काही दिसत नव्हते. शहरात थंडीचा कडाका इतका होता की कुल मनालीला असल्याचा भास अनेकांना झाला. तर या क्षणाचा आंनद मोबाइलमध्ये टिपण्याचा सेल्फीचा मोह अनेकांना आवरला नाही. सकाळी आठपर्यंत बहुतांशी ठिकाणी सूर्यदर्शन झालेच नाही. तर वाहनधारकांना हेडलाईट लावल्याशिवाय समोरचे काही दिसत नव्हते. हवामानात एकदम बदल झाल्याने जनजीवन काहीसे विस्कळीत झाले.

गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा शिडकावा होऊन थंडी गायब झाल्याचा अनुभव घेताना पहाटे मात्र अवघे मनमाड शहर धुक्यात हरविल्याचे चित्र पाहावयास मिळाले. धुके व गुलाबी थंडीचा अनुभव मनमाडकरांना सहसा मिळत नाही. आज पहाटे धुक्याची दुलई व गुलाबी थंडीचे वातावरण अनुभवण्यासाठी मनमाडकरांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडले होते. घराबाहेर मोकळ्या अंगणात रस्त्यावर 'सेल्फी' घेण्याचा मोह अनेकांना आवरला नाही. गेल्या आठवड्यापासून शहर व परिसरात हवामानात बदल होत आहे. गेल्या दोन आठवड्यापूर्वी हिवाळ्याची तीव्रता वाढून थंडीचे प्रमाण चांगलेच वाढले होते. थंडीचा कडाका चांगलाच वाढला होता. त्यानंतर अचानकपणे हवामानात बदल होऊन बेमोसमी पावसाचा शिडकावा झाला दोन तीन दिवस पावसाचा शिडकावा होत असताना थंडी गायब होऊन उकाडा जाणवत असताना ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शनही झाले नव्हते. ढगाळ वातावरण असतानाच मंगळवारी पहाटे अचानकपणे वातावरणात धुके पसरले. पाठोपाठ गुलाबी थंडीही जाणवत गेली. पहाटे धुके इतके वाढले होते की रस्त्यावरून फेरफटका मारताना समोरील फुटाच्या अंतरावरचेही काही दिसत नव्हते. सकाळी उशिरापर्यंत ही स्थिती होती. त्याचा परिणाम रस्ता वाहतुकीवर झाला. थंडीच्या मोसमातील या अनोख्या संधीचा आबालवृद्धांनी मनमुराद आनंद लुटला.
 

 

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा
 

महामार्गावर दिवे लावून वाहनधारकांची कसरत 

पुणे इंदौर महामार्गावर दाट धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. वाहनचालकांना अगदी काही अंतरावरचेही स्पष्ट दिसत नव्हते. त्यामुळे वाहनांचा वेग आपोआप कमी झाला. वाहनांचे दिवे लावून प्रवास करावा लागला. हीच परिस्थिती शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही होती. पहाटे कामाला जाणारे कामगार अंगात स्वेटर आणि डोक्याला मफलर गुंडाळून जाताना दिसले. पहाटे व्यायाम किंवा फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी धुक्याचा मनमुराद आनंद घेतला. अनेक वाहनचालकांनी रस्त्याच्या कडेला काही काळ थांबून धुके निवळण्याची वाट पाहिली.

रब्बी हंगामातील पिकांवर परिणाम 

ऐन थंडीच्या मोसमात धुक्याची चादर पसरल्याने याचा परिमाण रब्बी पिकांवर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात रब्बी पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. ज्या पिकांची वाढ पूर्ण झाली आहे त्यांना धोका नसला तरी जी पिके भरण्याच्या अवस्थेत आहेत त्या पिकांना याचा धोका निर्माण होऊ शकतो. धुक्याचे थेंब पिकांवर साठून राहिल्याने सदर पिके काळी पडू शकतात. जिल्ह्यातील कांदा, गहू, हरभऱ्यासह ज्वारी, सूर्यफूल, मोहरी, बटाटा, मेथी यासह फळ, पालेभाज्या यावर याचा परिणाम होऊन रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ