VIDEO : मनोरंजनाच्‍या क्षेत्राद्वारे होईल मायमराठीचा जागर; चिन्‍मय उदगीरकर सोबत मनमोकळ्या गप्पा

नाशिक : काळ बदलला असून, प्रमाण भाषेचा आग्रह धरणे आजच्‍या काळात योग्‍य ठरणार नाही. प्रत्‍येक प्रदेशनिहाय भाषेतील शब्‍द अन्‌ संवादाची शैली बदलते. नेमके हेच भाषेतील ‘लोकल फ्लेवर’ मनोरंजन क्षेत्रातून रसिकांपर्यंत पोचत असून, याबाबत लोकांमध्ये आकर्षण वाढत आहे. चित्रपट, मालिकांपासून अलीकडील काळात वेबसिरीज अशा विविध माध्यमांतून दर्जेदार निर्मिती होताना मायमराठीचा जागर आगामी काळात होईल, अशी भावना अभिनेता चिन्‍मय उदगीरकर याने व्‍यक्‍त केली. 

मायमराठीच्या जागराविषयी मनमोकळ्या गप्पा
मराठी राजभाषा दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी (ता. २६) चिन्‍मयने ‘सकाळ’च्‍या सातपूर कार्यालयास भेट देत मायमराठीच्या जागराविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या. ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी स्‍वागत केले. सामाजिक कार्यकर्ते राजेश पंडित या वेळी उपस्थित होते. चिन्‍मय म्‍हणाला, की चित्रपट व मालिकांच्‍या जोडीला आता मराठी वेबसिरीज गाजत आहेत. ‘मनिहॅश’सारख्या स्‍पॅनिश वेबसिरीज पाहताना मराठी रसिक विविध मराठी वेबसिरीजचाही आनंद घेताय.

संतांची असलेली मोठी परंपरा

इंटरनेटचा वापर वाढत असताना त्‍यातुलनेत कंटेंट विकसित करण्याचे आव्‍हान आगामी काळात असणार आहे. त्‍यासाठी नवनवीन नाटकांसोबत जुन्‍या गाजलेल्‍या नाटकांचे चित्रीकरण करत डिजिटल स्‍वरूपात उपलब्‍ध करून देता येऊ शकतात. छत्रपती शिवाजी महाराजांसह अनेक थोरांबाबतची माहिती प्रेक्षकांपर्यंत पोचविता येऊ शकते. मायमराठीमध्ये साहित्याच्यासोबत संतांची असलेली मोठी परंपरा आपल्यादृष्टीने जमेची बाजू आहे. 

धीराने परिस्‍थिती हाताळली पाहिजे
मनमोकळ्या गप्पा मारताना चिन्‍मयने आपल्‍या सुदृढ आरोग्‍याचे रहस्‍य उलगडले. अभिनयाचा भाग व गरज म्‍हणून शरीरसौष्ठव करावे लागते. परंतु मानसिक आरोग्‍य सर्वांत महत्त्वाचे असून, ते स्‍वस्‍थ राहिले तर कुठल्‍याही क्षेत्रात चांगली कामगिरी करता येऊ शकते. कलावंतासोबतच सामान्‍यांनीही ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. तसेच सध्याच्‍या काळात व्‍यक्‍त होण्याची घाई करण्यापेक्षा धीराने परिस्‍थिती हाताळल्‍यास समस्‍यांचे निराकरण अधिक प्रभावी पद्धतीने होऊ शकते. 

नाशिकमध्ये चित्रीकरणातून दादासाहेब फाळकेंना मानवंदना 
लॉकडाउन काळात मुंबईतील चित्रीकरण ठप्प झाल्‍यानंतर सातारा, कोल्‍हापूरसह अन्‍य ठिकाणांची चाचपणी निर्माते व दिग्‍दर्शकांकडून केली. परंतु मुंबईच्‍या नजीक असलेल्‍या नाशिकचा विचार मनात आला नाही. चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना मानवंदना वाहण्याच्‍या उद्देशाने नाशिकमधील ठळक वैशिष्ट्ये निदर्शनास आणून दिली. यानंतर नाशिकला मालिका, चित्रपटांपासून वेबसिरीजचे चित्रीकरण सुरू झाले आहे. विशेष बाब म्‍हणजे स्‍थानिक कलावंतांना यातून संधी मिळत असून, येथे चित्रीकरणासाठी आवश्‍यक तंत्रज्ञ तयार होत असल्‍याचे समाधान आहे. १९५०, ६० च्‍या कालावधीतील नाशिक वेबसिरीजच्‍या माध्यमातून प्रेक्षकांच्‍या भेटीला आणला जाणार असल्‍याचेही चिन्‍मयने सांगितले. 

साहित्‍य संपदेवर मराठीला धोका नाही 
मराठी साहित्‍याला मोठी परंपरा आहे. वाङ्‌मयातील समृद्धतेच्‍या जोरावर संहिता दर्जेदार निर्माण होऊ शकते. मनोरंजनाकडे प्रेक्षक वैचारिक दृष्टिकोनातून बघत असतात. त्‍यामुळे साहित्‍य संपदेच्‍या पायाभरणीमुळे मनोरंजन क्षेत्राद्वारे मराठी भाषा ही कायम जनमानसाच्‍या जिव्‍हाळ्याची असेल, असे सांगताना नाशिकमध्ये साहित्‍य संमेलन होणार असल्‍याबद्दल आनंद व्‍यक्‍त केला. संमेलनाद्वारे चांगले लेखक, कवी व साहित्‍यिक घडतील, असा विश्र्वास चिन्‍मयने व्‍यक्‍त केला. 

गोदावरी माझी नदी, मराठी माझी भाषा उपक्रम 
मॅगेसेसे पुरस्‍कार विजेते डॉ. राजेंद्रसिंह यांच्‍या प्रेरणेतून व दक्षिणातील राज्‍यात राबविलेल्‍या संकल्‍पनेवर आधारित नाशिकहून ‘गोदावरी माझी नदी, मराठी माझी भाषा’ उपक्रम राबविला जाणार आहे. याअंतर्गत गोदावरीच्‍या उगमापासून, महाराष्ट्राच्‍या सीमेपर्यंत गोदावरी वाहत असलेल्‍या प्रत्‍येक शहर, गावात जागर केला जाईल. नदी बारमाही प्रवाहित राहाण्याच्‍या अनुषंगाने हा अनोखा प्रयत्‍न ठरेल, असा विश्र्वास चिन्‍मयने व्‍यक्‍त केला.