VIDEO : रेमडेसिव्‍हिरसाठी धुळे, जळगावातील अनेकांची नाशिकमध्ये धाव; रात्री उशीरपर्यंत मेडिकल बाहेर गर्दी 

नाशिक : एकीकडे कोरोनाबाधित रुग्‍ण संख्येत वाढ होत चालली असताना, अत्‍यावस्‍थ रुग्‍णांमध्येही वाढ होत चालली आहे. कोरोना बाधितांच्‍या उपचारासाठी रेमडेसिव्‍हिर इंजेक्‍शनच्‍या मागणीत लक्षणीय वाढ, तर मर्यादित उपलब्‍धता झाल्‍याने तुटवडा निर्माण झाला आहे. इंजेक्शन घेण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागासह धुळे, जळगावमधून अनेक जण उशिरा ठाण मांडून होते.

रुग्‍णांच्‍या नातेवाईकांना भल्या ‍सकाळपासून रांगेत उभे राहावे लागत आहे. कोठे इंजेक्‍शन उपलब्‍ध होते, याचा शोध घेताना चारही दिशांना धावाधाव करावी लागते आहे. दरम्‍यान बुधवारी (ता.७) रात्री आठला संचारबंदी लागू झाल्‍यानंतर रुग्‍णांच्‍या नातेवाईकांची गर्दी मेडिकल बाहेर बघायला मिळाली. 

 अंगावर शहारे आणणारे दृष्ट

डॉक्‍टरांकडून सूचना मिळताच रुग्‍णांच्‍या नातेवाईकांना रेमडेसिव्‍हिर इंजेक्‍शन उपलब्‍ध करून घेण्यासाठी दमछाक करावी लागत आहे. अनेकांना तर अथ्थक परीश्रम घेऊनही इंजेक्‍शन उपलब्‍ध होत नसल्‍याची स्थिती बघायला मिळते आहे. दरम्‍यान, बुधवारी (ता.७) इंजेक्‍शन मिळविण्यासाठी शहर परीसरातील मेडिकल्‍सबाहेर जिल्ह्यासह धुळे, जळगावमधून आलेल्यांची मोठमोठ्या रांगा लागल्‍याचे चित्र कायम होते. इतकेच काय तर रात्री उशिरापर्यंत इंजेक्‍शनची उपलब्‍धता होण्यासाठी शर्तीचे प्रयत्‍न सुरु होते. गर्दीवर नियंत्रणासाठी पोलिसांना हस्‍तक्षेप करावा लागत असल्‍याची परिस्‍थिती होती. आठनंतर संचार बंदी लागू असून, नागरिकांना रस्‍त्‍यावर फिरण्यास मनाई आहे. असे असताना इंजेक्‍शन मिळेल या आशेने नागरीक मेडिकल बाहेर रांगांमध्ये उभे असल्‍याचे अंगावर शहारे आणणारे दृष्ट सध्या बघायला मिळते आहे. गर्दी टाळण्यासाठी व्‍यावसायिकांकडून टोकन पद्धतीचा वापर केला जात असून, वैयक्‍तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून इंजेक्‍शन घेण्यासाठी बोलविले जात आहे. 

हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश

माल उशीरा आल्‍याने गैरसोय 

रोज सुमारे साडे चार ते पाच हजार इंजेक्‍शन जिल्‍ह्‍यासाठी उपलब्‍ध करून दिल्‍या जातात. परंतु, बुधवारी पुरवठ्यासाठी निघालेल्‍या वाहनात बिघाड झाला. यामुळे इंजेक्‍शन नाशिकला उपलब्‍ध होण्यासाठी दुपारी चार वाजले होते. तोपर्यंत रुग्‍णाच्‍या नातेवाईकांची गर्दी वाढतच चालली होती. अन्न व औषध प्रशासन विभागाच्‍या माहितीनुसार दिवसभरात साडे चार इंजेक्‍शन उपलब्‍ध झाले असून, शासन स्‍तरावर अडीच हजारांचा साठा उपलब्‍ध होता. 

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ

अनेक प्रश्‍न अनुत्तरीतच 

इंजेक्‍शनचा कृत्रिमरित्‍या तुटवडा निर्माण केला जातो आहे का?, लोकसंख्या निहाय जिल्‍ह्‍यांना इंजेक्‍शनचा साठा का उपलब्‍ध होत नाही आहे?, जिल्‍ह्‍यातील नागरीकांना वाटपात प्राधान्‍य का दिले जात नाही आहे? असे असंख्य प्रश्‍न रांगेत उभ्या रुग्‍णांच्‍या नातेवाईकांकडून उपस्‍थित केले जात आहेत. परीस्‍थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने यावर वेळीच तोडगा न काढल्‍यास जनतेचा उद्रेक होण्याची भिती व्‍यक्‍त होते आहे.