VIDEO : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘देवमामलेदार’ यात्रोत्सवास सुरूवात; तुरळक भाविकांच्या उपस्थिती

सटाणा (जि.नाशिक) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व बागलाण तालुक्याचे आराध्यदैवत असलेल्या देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या १३४ व्या पुण्यतिथी सोहळ्यास आज शनिवार (ता.९) रोजी पहाटे चार वाजता वेद मंत्रोच्चारात सुरुवात झाली. या सोहळ्यानिमित्त दरवर्षी भरवला जाणारा यात्रोत्सव आणि ऐतिहासिक रथ मिरवणूक यंदा कोरोनामुळे १३४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच रद्द झाल्याने भाविकांमध्ये निरुत्साह आहे. 

१३४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच यात्रा रद्द 
आज पहाटे बागलाणचे प्रभारी तहसीलदार शुभम गुप्ता, ईशा जैन, नगराध्यक्ष सुनील मोरे, योगिता मोरे, देवस्थान अध्यक्ष भालचंद्र बागड, सौ.अरुणा बागड व विश्वस्त हेमंत सोनवणे यांच्या सपत्नीक हस्ते महापूजा व अभिषेक करण्यात आला. दरवर्षी महापूजेवेळी पहाटे चार वाजेपासूनच भाविकांची असणारी मोठी गर्दी यंदा कोरोनामुळे नव्हती. त्यामुळे आज पहाटे तुरळक भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. ब्राह्मण वृंदांच्या वेदमंत्रोच्चाराने पहाटेच्या निरव शांततेत धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. यंदा यात्रोत्सवाबरोबरच शहरातील रथमिरवणुकही रद्द करण्यात आल्याने आज दुपारी चार वाजता मंदिरालगत असलेल्या महात्मा गांधी चौकात जागेवरच पोलीस बांधवांच्या हस्ते पारंपारिक पद्धतीने रथ ओढून यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.

हेही वाचा > नियतीची खेळी! एका मित्राला लागली हळद ,तर दुसऱ्याला दिला अग्नि; अक्षयच्या अवेळी जाण्याने परिसरात हळहळ

ऐतिहासिक खुर्चीसह महाराजांच्या मूर्तीची विधिवत पूजा
दरम्यान, प्रभारी तहसीलदार शुभम गुप्ता व ईशा जैन यांच्या हस्ते येथील तहसील कार्यालयातील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांनी ज्या खुर्चीवर बसून काम केले होते, त्या ऐतिहासिक खुर्चीसह महाराजांच्या मूर्तीची आज पहाटे विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या सपत्नीक हस्ते पोलीस ठाण्याच्या आवारातील देवमामलेदारांच्या मंदिरात आज पहाटे अभिषेक व महापूजा करण्यात आली.

हेही वाचा > माहेरहून सासरी निघालेली विवाहिता चिमुकलीसह प्रवासातच गायब; घडलेल्या प्रकाराने कुटुंबाला धक्काच