VIDEO : वडाळागावातील प्लॅस्टिक गुदामाला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान

इंदिरानगर (नाशिक) : दहा वाजेच्या सुमारास अचानक बाहेर धूर दिसला. अन् नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. घडत असलेला प्रकार बघून सगळ्यांचाच उडाला थरकाप. कारण समोर सुरु होता अक्षरश: अग्नितांडवच. अऩ् नंतर घडले असे...

अशी आहे घटना

सोमवारी (ता.30) रात्री दहाच्या सुमारास वडाळा गावालगत असलेल्या अण्णा भाऊ साठेनगरमधील प्लॅस्टिकच्या गुदामाला भीषण आग लागली. शहरातील शिंगाडा तलाव, नाशिक रोड, सिडको, पंचवटी आदी सर्व भागातील बारा अग्निशमन दलाचे बंब या ठिकाणी दाखल झाले. युसूफ तरार यांच्या मालकीचे हे गुदाम. परिसरातील वीज बंद केल्याने आणि अरुंद गल्ल्या असल्याने आग विझविण्याच्या कामात मोठी अडचण येत होती. बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यास अवघड झाले होते. ओळीने सात ते आठ गोदामे असल्याने वेगाने आग पसरली. दरम्यान अण्णा भाऊ साठेनगर, मेहबूबनगर आणि आसपासच्या भागात राहणारे नागरिक भीतीपोटी घराच्या बाहेर आले होते.

हेही वाचा >> खळबळजनक! तीन दिवसांपासून बेपत्ता तरुणाची थेट मिळाली डेड बॉडीच; कुटुंबाला घातपाताचा संशय

दरम्यान, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि शहरातील सर्वच अग्निशमन 12 बंब घटनास्थळी दाखल झाल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले. आग पूर्णपणे आटोक्यात आणली तरी देखील साधारणपणे लाखो रुपयांचे सोफा सेट आणि प्लास्टिक गुदामाचे नुकसान झाल्याचे मालकांनी यावेळी सांगितले.

दर दोन - चार महिन्यांत वडाळा परिसरात आग लागण्याची प्रकार नेहमीच घडत असून यावर मनपा प्रशासनाने सुरक्षेचे उपाय तपासून गुदामधारकांना सूचना  मार्गदर्शक तत्वे ठरवून देणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.