VIDEO : साडेपाच फुटांच्या नागोबाचे टॉयलेटमध्ये दर्शन! काहीसा विनोदी परंतु धक्कादायक प्रकार

सिडको (नाशिक) : घरात टॉयलेटला जाणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टिपथास जेव्हा अचानक टॉयलेटच्याच भांड्यात साडेपाच फुटांच्या भल्यामोठ्या नागोबाने फणा काढून दर्शन दिले, तेव्हा मात्र संबंधिताची चांगलीच पाचावर धारण बसल्याचा काहीसा विनोदी परंतु धक्कादायक प्रकार बघायला मिळाला. या ‘टॉयलेट एक कहानी’ची नागरिकांमध्ये भलतीच खमंग चर्चा यानिमित्ताने ऐकायला मिळत आहे.

‘टॉयलेट एक कहानी’ची नागरिकांमध्ये भलतीच खमंग चर्चा

उंदराच्या मागे आलेल्या नागोबाने थेट घराच्या फुटलेल्या पाइपामध्ये प्रवेश करून टॉयलेटच्या भांड्यात बाहेर फणा काढून निघाला. या वेळी घरातील एक सदस्य टॉयलेटला गेल्याने हा प्रकार अचानक त्याच्या लक्षात आला. त्या वेळी त्यांनी त्वरित सर्पमित्रांना बोलावले व काही क्षणांत नागोबाला पकडले.

 

नागरिकांनो, कृपया घरात साचलेले खरकटे व घाण घराच्या आजूबाजूला टाकू नका, असे महापालिका आरोग्य विभाग वारंवार सांगत असतानादेखील काही नागरिक उरलेले अन्न व खरकटे नेहमीच बाहेर टाकतात. नेमक्या याच कारणामुळे अशा ठिकाणी उंदरांचा सुळसुळाट होतो. सहाजिकच निसर्गाच्या नियमाप्रमाणे त्यांच्या मागे साप येतात. एवढी साधी गोष्ट माहीत असतानादेखील नागरिक बेजबाबदार वागत असल्याचे चित्र नेहमीच दिसते.

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

सुदैवाने नागोबाने घरातील कोणालाही इजा केली नाही

जेव्हा एखादा साप उंदराचा मागोवा घेत-घेत आपल्या घरात शिरतो, तेव्हा मात्र घरच्यांची चांगलीच तारांबळ उडते. असाच काहीसा प्रकार नुकताच सिडकोतील धन्वंतरी मेडिकल कॉलेजमागे असलेल्या वसाहतीमध्ये घडल्याचे बघायला मिळाले. पण त्यातून जो प्रसंग उभा राहिला तो सर्वांच्या अंगावर काटा आणणारा ठरला. सुदैवाने नागोबाने घरातील कोणालाही इजा केली नाही म्हणून बरे झाले. नेहमीप्रमाणे नागरिकांच्या हाकेला प्रतिसाद देणारे सर्पमित्र मनीष गोडबोले घटनास्थळी आले आणि अवघ्या काही वेळात त्यांनी नागोबाला पकडले. त्यानंतर त्यास रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी सोडण्यात आले. 

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO