Weightlifting : मनमाडच्या आकांक्षाला कांस्यपदक, ताश्कंद येथील आशियाई यूथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत डंका

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
उझबेकिस्तानच्या ताश्कंद येथे सुरू असलेल्या आशियाई यूथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या आकांक्षा व्यवहारे हिने कांस्यपदक पटकावले. 40 किलो वजनी गटात तिने 55 किलो स्नॅच, 70 किलो क्लिन जर्क असे 125 किलो वजन उचलून चमकदार कामगिरी बजावली. आकांक्षाने पदक कमावून सातासमुद्रापार तिरंगा फडकविल्याने शहरातील इतर खेळाडूंनी जल्लोष केला, तर आमदार सुहास कांदे यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

उझबेकिस्तानच्या ताश्कंद येथे 15 ते 26 जुलै दरम्यान आशियाई यूथ ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेत अनेक देशांचे खेळाडू सहभागी झाले आहेत, तर भारतातून आकांक्षाचा समावेश असून रविवारी (दि. 17) तिने कांस्यपदक पटकाविले. यापूर्वी तिने मेक्सिको येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले. तिच्या यशाबद्दल आमदार सुहास कांदे, महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष संजय मिसर, सचिव प्रमोद चोळकर, भारतीय व महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघाचे उपाध्यक्ष संतोष सिंहासने यांनी तिचे अभिनंदन केले.

आकांक्षाला भारतीय संघाबरोबर ताश्कंदला गेलेल्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर व छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले. जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील, मोहन अण्णा गायकवाड, डॉ. सुनील बागरेचा, प्रा. दत्ता शिंपी, छत्रे विद्यालयाचे पी. जी. धारवाडकर, अध्यक्ष पी. जे. दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर आदींनी आकांक्षाचे अभिनंदन केले.

The post Weightlifting : मनमाडच्या आकांक्षाला कांस्यपदक, ताश्कंद येथील आशियाई यूथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत डंका appeared first on पुढारी.