Women’s day 2021 : केवळ महिलांना प्रवेश असलेला ‘तो’ अभूतपूर्व दर्गा! पर्यटकांना विशेष आकर्षण

नाशिक : बहुतांशी दर्ग्यांमध्ये केवळ पुरुषांनाच प्रवेश असल्याचे अनेकादा ऐकले आहे. केवळ महिलांना प्रवेश असणारा दर्गाही असू शकतो, हे कुणास खरे वाटणार नाही. मात्र, नाशिकमधील हा दर्गा त्यास अपवाद ठरत आहे. या दर्ग्यात केवळ महिलांनाच प्रवेश आहे, हे सर्वांसाठी विशेष आहे. 

पौराणिक दर्गा अपवाद
नाशिक शहरात अनेक दर्गे आहेत. त्यात पुरातन काळापासून केवळ पुरुषांनाच प्रवेश आहे. तेथील सर्वधार्मिक कार्यक्रम पुरुषांच्या माध्यमातूनच होत असतात. महिला दर्ग्याबाहेरूनच दर्शन घेत मनोकामना करीत असतात. भद्रकाली फुले मार्केट परिसरातील सय्यदानी माँजी साहेबा यांचा पौराणिक दर्गा यास अपवाद आहे. या दर्ग्यामध्ये केवळ महिलांनाच प्रवेश दिला जातो. परिसरातील महिलाच दर्ग्यातील पारंपरिक धार्मिक विधी पार पाडण्यापासून ते स्वच्छतेचे काम करतात. पुरुषमंडळी दर्ग्याच्या बाहेरूनच दर्शन घेतात.

हेही वाचा - सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; गेल्या १० महिन्यांत निच्चांकी स्तर

संदल अर्पण

इतकेच नव्हे, तर दर्ग्याचा संदल शरीपही महिलांच्या हस्ते अर्पण केला जातो. त्यांच्याकडूनच (नियाज) महाप्रसादाचा कार्यक्रम होतो. इस्लामिक कालगणनेच्या सफर महिन्याच्या ऊर्दू २४ तारखेस दर्ग्याचा संदल शरीपचा कार्यक्रम होतो. सायंकाळी धार्मिक वातावरणात संदल शरीपची फुले मार्केट, खडकाळी, दूध बाजार परिसरातील मिरवणूक काढण्यात येते. रात्री उशिरा संदल अर्पण केला जातो. 

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा

महिलांना त्यांचा आनंद

दरम्यान, संदल अर्पण करणे, फातेहा पठण, चादर शरीप अर्पण करणे, असे विविध धार्मिक कार्यक्रम महिलांकडून केले जातात. शहराच्या विविध भागांसह जिल्हा तसेच राज्यभरातून महिला संदल शरीपनिमित्त दर्शनासाठी येत असतात. नवस करीत असतात, तर कुणी नवसपूर्ती करतात. अशी आगळीवेगळी परंपरा असलेला दर्गा केवळ जुने नाशिक परिसरात असल्याने तेथील महिलांना त्यांचा आनंद वाटतो. 

तरुणींचे अधिक प्रमाण 
सय्यदानी माँजी साहेबा यांच्या दर्ग्यामध्ये विविध वयोगटातील महिला दर्शनासाठी येतात. यात विशेषत: तरुणींचे प्रमाण अधिक असते. चांगल्या कुटुंबात विवाह होणे, संतानसुख मिळणे, विविध क्षेत्रात त्यांची प्रगती होणे असे नवस महिला बोलतात. गुरुवारी दर्शनासाठी अधिक गर्दी असते.