Women’s day 2021 : ‘तिच्या’ मातृत्वाचा तीन तासांचा थरार! भावनांच्या व जोखमीच्या हिंदोळ्यावर माणुसकीचे कसब पणाला

गणूर (जि.नाशिक) : वेळ दुपारी अडीच-तीनची. उन्हाच्या प्रचंड तडाख्यात प्लॅस्टिक, तसेच कचऱ्याच्या या ढिगाहून त्या ढिगावर चतकोर भाकरीचा शोध सुरू असताना तिला प्रसूतिपूर्व कळा सुरू झाल्या. काही संवेदनशील नजरांनी ही गोष्ट हेरली...

प्लॅस्टिक अन्‌ शिळ्या भाकरीवरचे आयुष्य...

चांदवड शहरात रविवारी (ता. ७) भाकरतुकड्याच्या शोधात भटकणाऱ्या मोकाट गायीला कडाक्याच्या उन्हात भरदुपारी प्रसूतिपूर्व वेदना सुरू झाल्या. अगोदरच प्लॅस्टिक अन्‌ शिळ्या भाकरीवरचे आयुष्य... त्यात शरीरात पाण्याचीही कमतरता असल्याने तिचे नैसर्गिकरीत्या प्रसूत होणे कठीण होते. ही गोष्ट लक्षात येताच ग्लोबल रिसर्च ॲन्ड एज्युकेशन फाउंडेशनच्या अध्यक्षा रिंकू भूषण कासलीवाल यांनी तातडीने आजूबाजूच्या नागरिकांसह पशुधन विकास अधिकारी डॉ. वैभव आहेर यांना माहिती दिली. 

भावनांच्या व जोखमीच्या हिंदोळ्यावर तीन तासांचा थरार
डॉ. वैभव आहेर व नागरिकांनी जवळ जाताच गायीने हल्ला चढवत असुरक्षिततेच्या भावनेतून तेथून पळ काढला. मात्र, बराच वेळ देऊनही वासरू अर्धे बाहेर व अर्धे आत अशा अवस्थेत मरणाच्या दारात असल्याने डॉ. वैभव आहेर, पीयूष नहार, पशुधन पर्यवेक्षक वसंत वाळुंज, श्याम जगताप, जनार्दन जाधव, गोविंदराव झारोळे यांनी जोखीम पत्करून गायीला बांधले. डॉक्टर व पशुधन पर्यवेक्षकांनी तातडीने गायीवर उपचार करत तब्बल तीन तासांनी गोंडस वासराला सुखरूप बाहेर काढले. भावनांच्या व जोखमीच्या हिंदोळ्यावर तीन तास चाललेला हा थरार अखेर गायीच्या सुखरूप प्रसूतीने संपला. 

हेही वाचा - सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; गेल्या १० महिन्यांत निच्चांकी स्तर

डॉक्टर अन्‌ संवेदनशील माणसांचे कसब पणाला

मग, तिच्या प्रसूतीसाठी झालेली धावपळ तब्बल तीन तास चालली अन्‌ जन्म झाला एका गोंडस वासराचा! प्लॅस्टिक आणि निर्जलीकरण (डिहायड्रेशन)मुळे धोक्यात आलेले गायीचे मातृत्व वाचविण्यासाठी डॉक्टर अन्‌ संवेदनशील माणसांचे कसब मात्र पणाला लागले! 

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा

मोकाट जनावरांचे आरोग्य प्लॅस्टिक कचरा व तत्सम गोष्टी खाल्ल्याने धोक्यात आहे. सोबतच तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून, पिण्याचे पाणीदेखील जनावरांना उपलब्ध होत नसल्याने विविध व्याधी जडत आहेत. सामाजिक संस्था, कार्यकर्त्यांनी पाणपोईसाठी समोर येण्याची गरज आहे. सोबतच प्लॅस्टिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून जनावरांच्या पोटात जाणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. -डॉ. वैभव आहेर, पशुधन विकास अधिकारी, चांदवड