World Food Day : आधुनिक यंत्रणांमुळे थांबली अन्नाची नासाडी 

World Food Day

नाशिक : दीपिका वाघ

आधुनिक यंत्रणांच्या सुविधांमुळे पूर्वापार चालत आलेल्या समस्या कमी होताना दिसत आहेत. कधी काळी अन्न नासाडी होण्याचे प्रमाण सर्वाधिक असताना, आता आधुनिक यंत्रणांमुळे अन्न नासाडीचे प्रमाण घटले आहे. कणीक मळण्यापासून ते पोळी लाटणे, भाज्या कापणे, रबडी पदार्थ करण्यासाठी अनेक यंत्रणा उपलब्ध झाल्यामुळे आता १० मिनिटांत १०० लोकांचा ताजा स्वयंपाक करणे शक्य झाले आहे. (World Food Day)

पूर्वी हजार लोकांचा स्वयंपाक मोठ्या पातेल्यात केला जायचा. त्यानंतर जेवणावळ बसायची, त्यातून अन्नाची नासाडी अधिक व्हायची. हॉटेल व्यावसायिक, लग्न समारंभाच्या ठिकाणी प्रमाणबद्धतेनुसार अन्नपदार्थ माणसांच्या अंदाजे संख्येनुसार केला जायचा. दरवेळी स्वयंपाकाचे गणित बरोबर येईलच असे होत नव्हते. परंतु आता ती पद्धत बंद झाली आहे. आता कार्यक्रमांमध्ये ‘लाइव्ह’ सिस्टीमनुसार स्वयंपाक केला जातो. त्यासाठी खास व्यवस्थापकाची नेमणूक केली जाते. जो कार्यक्रमातील परिस्थिती बघून अन्न किती लागणार त्याचे गणित ठरवतो. सर्व मटेरिअल तर रेडी असते, त्यानुसार स्वयंपाक किती लागणार, याचे नियोजन केले जाते. समजा, तीन तासांची जेवणावळ असेल, तर एकावेळी अर्ध्या तासात १०० लोक जेवण करतात. त्याप्रमाणे तेवढे मटेरिअल केले जाते आणि स्वयंपाक कमी-जास्त होत नाही. सर्व काही सिस्टीमेटिक सुरू असते. (World Food Day)

कार्यक्रमाला हजार पाहुण्यांऐवजी 1100 पाहुणे आले, तरी त्याचे व्यवस्थापन केटरिंग व्यावसायिकांकडे असते. हजार पाहुण्यांच्या स्वयंपाकाची ऑर्डर असताना ७०० पाहुणे आले, तरी उरलेले स्वयंपाकातील (कच्चा माल) भाजीपाला, पनीर, फळ, दुग्धजन्य पदार्थ फ्रीज व वेअर हाउसमध्ये साठवून ठेवले जाते आणि त्यांचा उपयोग दुसऱ्या समारंभात केला जातो. एकवेळ जास्त अन्न झाले, तर चालेल पण कमी नको पडायला म्हणून जास्त अन्न शिजवले जायचे पण आता परिस्थितीनुसार अन्नपदार्थ तयार केले जातात. त्यामुळे कोणताही पाहुणा उपाशी राहात नाही आणि अन्नाची नासाडी होत नाही.

उरलेले अन्न कन्टेनरमध्ये…(World Food Day)

हॉटेलमध्ये मिळणाऱ्या अन्नपदार्थांचे प्रमाण कमी-जास्त स्वरूपाचे असते. समजा, एक भाजी ऑर्डर केल्यानंतर ती दोन व्यक्तींना पुरून उरत असेल, तर ती वाया न जाता हॉटेल व्यावसायिक ती भाजी कंटेनरमध्ये पॅक करून देतात. या पद्धतीमुळे अन्न वाया जाण्याची शक्यताच राहात नाही.

पूर्वीसारखे अन्न वाया जाण्याची शक्यता आता कमी झाली आहे. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे अनेक यंत्रणा उपलब्ध झाल्या आहेत. नाशिकमध्ये झालेल्या ९४व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात आम्ही अन्न वाया जाऊ नये म्हणून प्रबोधनपर बोर्ड लावले होते. तसेच उष्टे अन्न टाकणाऱ्यांकडून २०० रुपये दंड घेतला होता. त्यासाठी खास काउंटर ठेवला होता आणि लोकांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले की, भविष्यात अन्न उष्टे टाकणार नाही. प्रत्येक समारंभात हा उपक्रम राबविला जातो.

-उत्तम गाढवे, अध्यक्ष, केटरिंग असोसिएशन, महाराष्ट्र

हेही वाचा :

The post World Food Day : आधुनिक यंत्रणांमुळे थांबली अन्नाची नासाडी  appeared first on पुढारी.