World kidney day 2021 : पतीचा जीव वाचविण्यासाठी धावली आधुनिक ‘सावित्री’! आणले मृत्यूच्या दारातून बाहेर

नाशिक : वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला सात फेरे मारून सातजन्मी हा पती मिळावा, अशी प्रार्थना स्त्रिया करतात. मात्र नाशिकच्या संगीता शाह यांनी पती शैलेश शहा यांना अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले. पुन्हा नवा जन्म दिला. ''आज मी जिवंत आहे, ते केवळ आणि केवळ म्हणजे माझी पत्नी संगीतामुळेच..." असे सांगायला शैलेश शहा कधीच विसरत नाही...असे काय घडले?

अखेर पतीच्या दुःखनिवारणासाठी धावली पत्नी
नाशिक कॅनडा कॉर्नर येथे राहणारे शैलेश शहा (वय 64) हे व्यावसायिक असून त्यांच्या आईची 2005 मध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी सहज म्हणून त्यांनी देखील काही शारिरीक चाचण्या केल्या. त्या चाचण्यांचे जेव्हा रिपोर्ट आले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना त्या रिपोर्टमध्ये असे समजले की त्यांच्या दोन्ही किडन्या निकाम्या झाल्या. आणि शहा कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले. डॉ. राजेश कुमार यांनी प्राथमिक उपचार करून कुटुंबीयांना धीर देत मुंबई अंधेरी येथील बीएसइएस हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याचा सल्ला दिला. अगोदरचे 6 वर्षे ते औषधोपचारावर होते. नंतर ते डायलिसीस वर होते. शैलेश यांना जीवदान देण्यासाठी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करणे अवश्यक होते. त्यांच्यावर अनेक वर्षे उपचार सुरू होते.

जीवाची पर्वा न करता धावली पत्नी

त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे समजले तेव्हा रुग्ण वाचवायचा कसा, कोण देणार किडनी या विचारात कुटुंब होते. मूत्रपिंड निकामी झालेल्या शैलेश यांच्यावर सातत्याने डायलिसिस सुरू होते.  शेवटी पतीच्या दुःखनिवारणासाठी पत्नी धावून आली. संगीता शाह यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता क्षणाचा विलंब न लावता आपल्या पतीला जीवदान मिळावे, यासाठी 11 ऑक्टोबर 2011 रोजी त्यांनी किडनीदान केले. आणि पत्नीने किडनी दान करून पतीला वाचवण्याचा निश्चय केला. संगीत शाह (वय 59) यांनी आपली किडनी देऊन पतीला जीवदान दिले. मुंबईच्या बीएसईएस रुग्णायलात किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया 11 ऑक्टोबर 2011 झाली आणि शैलेश शहा यांना जीवदान मिळाले. काही दिवसांनी त्यांना घरी सोडण्यात आले. त्यानंतर दर काही दिवसांनी त्यांची तपासणी सुरू झाली. त्यांच्यावर शस्त्रक्रियेनंतरचे उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती उत्तम आहे. धन्य ती माऊली. धन्य ते दान. संगीता शाह प्रत्यक्षात किडनीदान करून पतीला जीवदान देऊन खराखुरा आदर्श घालून दिला आहे.

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड
 

2011 वर्ष दाम्पत्याच्या आयुष्यात कलाटणी देणारे

पतीराजांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्याचे जेव्हा पत्नीला समजले. तेव्हा पत्नीला काय करावं काही सुचत नव्हते. कुटुंबाचा आधारवड जिवंत ठेवण्याबरोबर स्वत:च्या सौभाग्याचं रक्षण व्हावं म्हणून तिनं कसलीच पर्वा न करता किडनी दान करून पतीला जीवदान मिळवून दिलं. नाशिकमध्ये राहणारे शैलेश शाह यांचा संगीता यांच्या बरोबर 1984 मध्ये विवाह झाला. शैलेश शाह हे व्यावसायिक असून आहेत. पत्नीबरोबर सुखासमाधानात संसार करीत होते. त्यांच्या लग्नाला 37 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या संसाररूपी वेलीवर एक मुलगा ही आहे. पण 2011 हे वर्ष दाम्पत्याच्या आयुष्यात अचानक कलाटणी देणारे ठरले. 

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO 

केवळ पत्नीमुळेच मी जिवंत- शैलेश

माझ्या पत्नीचे माझ्यावर मोठे उपकार आहेत. तिचे ऋण मला आयुष्यभर न फेडण्याजोगे आहेत. तिच्यामुळेच मी पुढील आयुष्य सुखा समाधानाने जगणार आहे. तिच्यामुळे मला जगण्याची नवीन ऊर्जा मिळाली आहे. त्यामुळे डॉक्टर व माझी अर्धांगिनीचा आभारी आहे. अपघातात दोन्ही किडन्या फेल झाल्याने मी हताश झालो होतो, पण पत्नी संगीताने धीर देत तिच्या जीवाची पर्वा न करता स्वत:ची एक किडनी मला दान केली व माझा पुनर्जन्म झाला. आम्ही दोघे आनंदात संसार करीत आहोत. सर्वात श्रेष्ठदान अवयव दान असेच मला म्हणायचे आहे, असे शैलेश शहा यांनी सांगितले. आज मी आनंदी जीवन जगत आहे, त्याला केवळ आणि केवळ म्हणजे माझी पत्नी संगीतामुळेच...

मार्चच्या दुसर्‍या गुरुवारी जागतिक किडनी दिवस
दरवर्षी मार्चच्या दुसर्‍या गुरुवारी जागतिक किडनी दिन साजरा केला जातो. जागतिक किडनी दिनाचा उद्देश जगातील किडनीच्या आजाराचा वाढता प्रसार रोखणे आणि त्याचा प्रसार कमी करणे हे आहे. इंटरनॅशनल सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजी (आयएसएन) आणि इंटरनेशनल फेडरेशन ऑफ किडनी फाउंडेशनतर्फे 2006 साली जागतिक किडनी दिवस 66 देशांमध्ये सुरू करण्यात आला. निरोगी किडनीसाठी आहार खूप महत्वाचा आहे. आपण बर्‍याचदा आपल्या किडनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि किडनीसाठी आवश्यक पदार्थ आणि खाण्या-पिण्याकडे लक्ष देत नाही. शरीरातील सर्व अशुद्धी बाहेर टाकण्याचे कार्य मूत्रपिंड अर्थात किडनी करते. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी मूत्रपिंडाचे कार्य योग्य पद्धतीने होणे गरजेचे असते. परंतु, योग्य काळजी घेतली नाही तर मूत्रपिंडाचे विकार जडतात आणि जीवन त्रासदायक होऊन बसते. 

किडनी निरोगी राहणे अतिशय महत्त्वाचे
मूत्रपिंड अर्थात किडनी हा अवयव मणक्याच्या दोन्ही बाजूंना कमरेच्या थोड्या वरच्या बाजूला असतो. घेवड्याच्या आकाराचा आणि माणसाच्या मुठीएवढा असलेला हा अवयव शरीराचे एक महत्त्वाचे अंग आहे. ज्याप्रकारे एखादी गाळणी पाण्यातील कचरा, अशुध्दी गाळून शुध्द पाणी देते त्याचप्रकारे मूत्रपिंड शरीरातील टाकाऊ पदार्थ बाजूला करते. मूत्रपिंड दररोज जवळपास १८० लिटर इतके रक्त शुद्ध करते. त्यातून दोन लिटर मूत्र दररोज तयार होते. रक्तशुद्धीकरणाबरोबर मूत्रपिंड शरीरातील क्षारांचे प्रमाण संतुलित ठेवण्याचेही काम करते. मूत्रपिंडातून स्रवणाऱ्या हार्मोन्समुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. हाडे निरोगी राहतात आणि लाल रक्तपेशींच्या (आरबीसी) निर्मितीलाही मदत होते. अशी महत्त्वपूर्ण कार्य करणारे मूत्रपिंड निरोगी राहणे अतिशय महत्त्वाचे आहे.

साध्या व सोप्या चाचण्यांच्या आधारे उपचार शक्य
किडनी आजारांवर आता मोठ्या प्रमाणावर उपचार उपलब्ध आहेत. काही साध्या व सोप्या चाचण्यांच्या आधारे हे आजार ओळखून त्यावर उपचार शक्य आहेत. परंतु, यात विकार लवकरात लवकर ओळखून पेशंटला मूत्रपिंडविकारांच्या तज्ज्ञ डॉक्टरकडे घेऊन जाणे गरजेचे असते. एका मूत्रपिंडाचे काम थांबले तरी, एका मूत्रपिंडाच्या साह्याने शरीराचे सर्व काम सुरळीत पार पडू शकते. मात्र, दोन्ही दोन्ही मूत्रपिंडांचे काम पूर्णपणे ठप्प झाल्यास म्हणजे किडनी फेल झाल्यास पेशंटना डायलिसिस हा एकमेव पर्याय उरतो. डायलिसिस म्हणजे मूत्रपिंडाचे काम मशिनने करणे. वर्षानुवर्षे डायलिसिसच्या साथीने आयुष्य जगणारे अनेक पेशंट आहेत. त्यामुळे मूत्रपिंडाचा विकार असलेल्या पेशंटसाठी हे एक वरदान आहे. तसेच, डायलिसिस अशक्य झालेल्या पेशंटना मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा (kidney transplant) आधार आहे.