World Tiger Day : एक, दोन, तीन नव्हे…तब्बल 40 वेळा वाघांचे दर्शन, नाशिकच्या अनंत सरोदेंनी जोपासला आगळावेगळा छंद

tiger

ओझर : (जि. नाशिक) मनोज कावळे
हा छंद जीवाला लावी पिसे… हे गाणे प्रत्यक्षात कृतीत उतरविणारे नाशिक येथील पक्षिमित्र अनंत ऊर्फ बाळासाहेब सरोदे यांनी गेली 12 वर्षे व्याघ्र दर्शनाचा छंद जोपासला असून, ताडोबातील त्यांच्या नियमित भेटीमुळे तेथील वाघांनासुध्दा सरोदे जणू काही परिचितच झाले आहे. सरोदे यांनी व्याघ्र दर्शनाचा आगळावेगळा छंद जोपासत प्राण्यांच्या जगातील आपला संचार कायम ठेवताना त्यांना 40 वेगवेगळ्या वाघांचे दर्शन झालेले आहे.

साधारणपणे 2010 मध्ये पक्षिमित्र अनिल माळी यांच्याशी झालेल्या परिचयातून सरोदेंनी सिल्लारीच्या पेंच व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच सफारी केली. परंतु वाघदर्शनाअभावी त्यांच्या पदरी निराशाच पडली. परंतु कोणत्याही परिस्थितीत वाघ बघायचाच ही इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. त्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा येथे खास वाघ बघायला गेले. परंतु तेथेदेखील पहिले तीन दिवस निराशाच पदरी पडली. हताशपणे जंगलात फिरत असताना दुपारी खुटवंडा गेटमधून वसंत बंधारा येथे गाइडने वाघ पाण्यात बसल्याचे सांगितले. खूप वेळ तर पाण्यात वाघच दिसत नव्हता. सरोदेंची नजर सर्वत्र भिरभिरत होती, मात्र तरीदेखील नजरेस मात्र वाघ दिसत नव्हता. पाण्यात बसलेल्या वाघाने त्याची शेपटी हलविली आणि सरोदेंच्या गेल्या अनेक वर्षांच्या इच्छेचे चीज झाले. निवांतपणे पाण्यात पहुडलेल्या वाघाने 10 मिनिटांनंतर आपला मुक्काम तेथून हलविला.

पण, जाण्यापूर्वी दोन मिनिटे न्याहाळत तो जंगलात निघून गेला. या पहिल्या व्याघ्र दर्शनाने वाघ बघण्याचा छंदच सरोदेंना वर्षातून दोन वेळेस ताडोबाला घेऊन जात आहे. ताडोबात असलेल्या 110 पैकी आजपर्यंत 40 वेगवेगळ्या वाघांचे दर्शन त्यांना झालेले आहे. आजपर्यंत सरोदे यांनी ताडोबात वाघडोह, मटकासुर, गब्बर, छोटा मटका, बलराम, बगरंग, पारस हे नर वाघ तर मादी प्रकारात सोनम, माया, छोटी तारा, सितारा, माधुरी, देवडोह, छोटी मधु, कुवानी हे वाघ बघितले आहेत.

ते दोन पांढरे ठिपके डोळ्यांसारखेच…
वाघाच्या पंजाच्या फटक्यात 300 किलोची ताकद असते. वाघाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या कानाच्यामागे नैसर्गिकरीत्या पांढरे ठिपके असतात. मागून एखादा प्राणी हल्ल्यासाठी आला तर त्या प्राण्याला ते दोन पांढरे ठिपके डोळ्यांसारखेच दिसतात.

हेही वाचा :

The post World Tiger Day : एक, दोन, तीन नव्हे...तब्बल 40 वेळा वाघांचे दर्शन, नाशिकच्या अनंत सरोदेंनी जोपासला आगळावेगळा छंद appeared first on पुढारी.