World Water Day : गोदावरीच्या नशिबी उपेक्षाच! प्रदूषणासंदर्भात ठोस पावलं उचण्याची गरज

नाशिक : गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक विकास महामंडळाला कारवाईचे अधिकार दिले आहेत; तरीदेखील गोदावरी नदीपात्रात रसायनयुक्त पाणी,  पावसाळी गटारींमध्ये पाणी पुढे नदीला मिळते. तसेच स्मशानातील कोळसा, राख थेट नदीपात्रात जाते. कपडे धुणे या सर्व गोष्टींतून प्रदूषण होत असल्याची गंभीर बाब नोंदविण्यात आली आहे. गेली कित्येक वर्षे गोदामाई निमुटपणे होत असलेला हा अत्याचार सहन करत आहे. आज जागतिक जल दिनाच्या निमित्ताने गोदावरी नदीवरील घेतलेला हा आढावा....

गोदावरी प्रदूषणासंदर्भात पर्यावरण विभागाची ५ कंपन्यांना नोटीस
 गोदावरी नदीपात्रात रसायनयुक्त पाणी सोडले जात असल्याची बाब निदर्शनास आल्याने महापालिकेच्या पर्यावरण विभागाने पाच कंपन्यांना नोटीस पाठविली आहे. गोदावरी नदीच्या प्रदूषणासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल आहे. याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय कमिटी गठित केली आहे, तर नीरी या केंद्र सरकारच्या संस्थेने प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना सुचविल्या आहेत.गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक विकास महामंडळाला कारवाईचे अधिकार दिले आहेत; परंतु गोदावरीचे प्रदूषण कमी होत नसल्याने महापालिकेने सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीमधील भागाची पाहणी केली. त्यात रसायनयुक्त पाणी सोडले जात असल्याची बाब समोर आली. या संदर्भात औद्योगिक महामंडळासह प्रदूषण मंडळाला कारवाईचे पत्र देऊनही दुर्लक्ष केल्याने अखेरीस महापालिकेने अंबड औद्योगिक वसाहतीतील यशदा इंडस्ट्रीज, हॉटेल अजिंठा रेस्टॉरंट, युनिटी इंडस्ट्रीज, आरती एंटरप्राइजेस, अमालगमेटेड इंडस्ट्रिअल कंपोजिस्ट या पाच कंपन्यांना नोटीस बजावली. 

पावसाळी गटारीत पाणीमुळे प्रदुषण 

सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्यांकडून रस्त्याला लागून असलेल्या पावसाळी गटारींमध्ये पाणी सोडत असल्याने ते पाणी पुढे नदीला मिळते. त्यातून प्रदूषण होत असल्याची गंभीर बाब नोंदविण्यात आली आहे. यापूर्वी २० कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली होती; परंतु ठोस अशी कारवाई झाली नाही. 

गोदापात्राला गटारगंगेचे स्वरूप
माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत काही दिवसांपासून महापालिकेतर्फे शहराच्या सर्वच भागांत विशेष स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. त्यातंर्गत शनिवारी (ता.२७) फेब्रुवारी दरम्यान गंगाघाटावरील टाळकुटेश्‍वर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली खरी, परंतु या मोहिमेतून नाशिकची जीवनदायिनी असलेल्या गोदावरीकडे मात्र पूर्णतः दुर्लक्ष केल्याने या भागात नदीला अक्षरशः गटारगंगेचे स्वरूप आले आहे. गोदावरीचे संवर्धन व्हावे, म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने गोदावरीची दक्षता घेण्याचे आदेश नाशिक महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार महापालिकेतर्फे गोदावरीच्या रक्षणासाठी रामकुंडापासून टाळकुटेश्‍वर पुलापर्यंत काही सुरक्षारक्षकही नेमले होते. मात्र मागील महापालिका आयुक्तांच्या काळात हे कंत्राटी सुरक्षारक्षक कमी करण्यात आले. तेव्हापासून गोदावरीला कोणी वालीच नाही. टाळकुटेश्‍वर परिसरात हजारो टन गाळ व कचरा नदीपात्रात जमा झाली आहे. खरंतर किनाऱ्याबरोबरच नदीपात्राचीही स्वच्छता होणे गरजेचे होते. परंतु तसे न होता केवळ नदीपात्रालगतच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 

स्मशानातील कोळसा, राख थेट नदीपात्रात! कपडे धुण्यासाठी गर्दी  
गोदावरीच्या दोन्ही बाजूंना म्हणजे पंचवटी व शहराच्या बाजूला अशा दोन स्मशानभूमी आहेत. याठिकाणी अंत्यविधी झाल्यावर ती जागा पाण्याने स्वच्छ करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु, पाण्याच्या जोरदार प्रवाहाबरोबरच तेथे अर्धवट जळालेली लाकडे, कोळसा ठेप नदीपात्रात वाहून येत आहे. असे कोळसे, हाडे नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर आढळून आली. 
न्यायालयाच्या आदेशाने गोदापात्रात कपड्यांसह गाड्या धुण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. परंतु टाळकुटेश्‍वर परिसरात असलेल्या नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गर्दी होते. पहाटेपासून दुपारपर्यंत याठिकाणी कपडे धुण्यासाठी गर्दी होते. गाडगे महाराज पुलापर्यंतच्या परिसरात कपडे धुतल्यास दंडात्मक कारवाई होते. परंतु याठिकाणाकडे अद्यापही महापालिका प्रशासनाचे लक्ष नसल्याने कपड्यांसह गाड्या धुणारेही मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. 

गोदावरीतील पाणवेलींचा प्रश्न गंभीर! नदीकाठच्या नागरिकांसह जलचरांचे आरोग्य धोक्यात
गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून आ वासून उभा आहे. उन्हाळा आला की गोदावरीच्या प्रदूषणाची तीव्रता वाढत असून, गोदावरीत जलपर्णींचा विळखा वाढतच आहे. प्रशासनाकडून दर वर्षी जमेल तेवढा प्रयत्न करीत जलपर्णी हटवून गोदावरी स्वच्छ करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. मात्र जलपर्णी हटविण्यासह हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी शासनाकडून ठोस उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे. गोदावरी नदीच्या प्रदूषणाकडे शासनासह प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कानाडोळा होत आहे. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. दररोज गोदावरी नदीपात्रात निर्माल्यासह कचरा टाकला जात असल्याने तसेच शेवाळाचा थर अशा विविध कारणांमुळे बारमाही वाहणाऱ्या गोदावरीने प्रदूषणाची कमाल मर्यादा कधीच ओलांडली आहे. प्रदूषणाबाबत तक्रारी झाल्यानंतर प्रशासनाकडून जुजबी कारवाई करण्यासह कागदी घोडे नाचविण्यात येतात. 

शुद्ध पाण्यासाठी धावाधाव
नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याबरोबरच जलचरांचा प्रश्रही ऐरणीवर आला आहे. जलचर मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडत आहेत. पिण्यायोग्य पाणी नसल्याने उन्हाळ्यात काही गावांची शुद्ध पाण्यासाठी धावाधाव सुरू आहे. त्यातच जलपर्णींच्या समस्येने पुन्हा भर घातली आहे. उन्हाळ्यात प्रवाह थांवला की सांडपाण्याचा थर वाढत जातो. त्यामुळे जलपर्णींची समस्या आणखी बिकट बनते. जलपर्णींमुळे सायखेडा, चांदोरी नदीवरील पूल त्याचबरोबर विविध गावांच्या पाणीयोजनांच्या जॅकवेलला धोका निर्माण होतो. 

प्रदूषणामुळे आजार 

नुकताच गोदावरी नदीत सायखेडा परिसरात सांडपाण्यामुळे नदीच्या पाण्याचा रंग बदलून दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले होते. हे पाणी शेतीसाठी उपसा केल्यानंतर शेतकरी ॲलर्जी व त्वचेच्या समस्येने हैराण झाले. दारणा, सांगवीपासून गोंडेगाव व तेथून पुढे नांदूरमध्यमेश्वरपर्यंत जलपर्णीच दिसून येत असल्याने मैदानाचे स्वरूप आले होते. जलपर्णींमुळे जलचरांना ऑक्सिजन मिळत नसल्याने जलचर तडफडून मृत्युमुखी पडत आहेत. नाशिक महापालिका हद्दीपर्यंत जलपर्णी हटवली जात आहेत. या कामात सरकारी कामाचा फटकाही सहन करावा लागला. ‘सकाळ’च्या माध्यमातून जलपर्णी हटविण्यासाठी आवाज उठविला जात असताना प्रशासन मात्र सुस्त दिसून आले. 

गोदावरीसह उपनद्या-नाले स्वच्छतेसाठी १ हजार ५० कोटींचा प्रस्ताव 
आमदार दिलीप बनकर यांनी गोदावरीच्या स्वच्छतेकडे आणि आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांनी शहर बससेवेच्या प्रश्‍नाकडे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वेधले. त्या वेळी नाशिकमधील शहर बससेवा फेब्रुवारीअखेरपर्यंत सुरू होईल, असे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गोदावरीमधील गटारीचे पाणी बंद करा, मलनिस्सारण प्रकल्प बांधा आणि सुरळीत ठेवा व आपल्या डोक्यावर गोदावरी प्रदूषणाचे असलेले मोठे पाप कमी करा, अशा शब्दांमध्ये ठणकावले. त्यावर  जाधव यांनी गोदावरीसह उपनद्या, नाले स्वच्छतेसाठी एक हजार ५० कोटींचा प्रस्ताव असल्याचे नमूद केले.

अनेक माशांचा तडफडून मृत्यू

गोदावरी नदी ज्या परिसरातून वाहते त्या परिसरात मोठ्या प्रमाणात कारखाने आहेत. अनेक ठिकाणी केमिकल कंपन्या असल्यामुळे काही कंपन्या दूषित पाणी गोदावरी नदी पात्रात सोडतात. त्यामुळे पाणी खराब होऊन जलचर प्राण्यांच्या जीवाला धोका पोहचतो. त्याशिवाय नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पानवेली वाहत येऊन सायखेडा येथील पुलाला अडकतात. अनेक दिवस पानवेली एकाच ठिकाणी अडकून राहिल्यामुळे सडल्यामुळे त्याचा परिणाम मत्स्य प्राण्यांवर होतो. मंगळवारी (ता.५) मार्च दरम्यान सायंकाळी मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग वाढला आणि त्यासोबत पानवेली वाहून आल्या . शिवाय केमिकलमुळे पाणी दूषित झाल्यामुळे त्याचा परिणाम जलचर प्राण्यांच्या आरोग्यावर होऊन अनेक माशांचा तडफडून मृत्यू झाला. औदयोगिक विकास होत असतांना जलचर प्राण्यांचा जीव धोक्यात येत असून, प्रशासनाचे या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष होत आहे. नदीपात्रातील पानवेल काढण्यात प्रशासन हतबल झाले आहे. केमिकल पाण्यात सोडणाऱ्या कंपन्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.