Site icon

नाशिककरांनी केले होळीचे दहन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अवकाळी पावसाने उसंत घेतल्याने नाशिककरांनी सोमवारी (दि. ६) उत्साहात होळीचा सण साजरा केला. शहर परिसरात सायंकाळनंतर हाेलिकादेवीचे विधिवत पूजन करून तिचे दहन करण्यात आले. यावेळी नाशिककरांनी होळीच्या पवित्र अग्निमध्ये राग, लोभ, मत्सर, हेवे-दावे, अहंकाराचे दहन करतानाच सर्वत्र सुखशांती, बंधुत्व, प्रेम निर्माण होवो, अशी प्रार्थना केली.

नाशिक शहर व परिसरात रविवारी (दि.५) मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसाचे सावट होळी सणावर होते. मात्र, पावसाने उसंत घेतल्याने नाशिककरांच्या उत्साहाला उधाण आले. सायंकाळी गल्लोगल्ली, चौकाचौकांमध्ये तसेच सोसायट्यांच्या आवारात गोवऱ्यांचे एकावर एक थर रचत होळी उभारण्यात आली. त्यानंतर हळदी-कुंकू, गुलाल व फुलांच्या सहाय्याने विधिवत होळीचे पूजन करण्यात आले.
शहरातील अबालवृद्धांनी ढोल-ताशांच्या तालावर होळीभोवती फेर धरला. तसेच बालकांनी ‌’होळी रे, होळी पुरणाची पोळी’ अशा घोषणा दिल्या. महिलावर्गाने होलिकादेवीची मनोभावे पूजा करत पुरणपोळीचा नवैद्य दाखविला. होळीच्या पवित्र अग्नीमध्ये दु:ख, नैराश्य व दारिद्रयाचे दहन करत नागरिकांनी देशावरील विविध संकटे दूर कर असे मागणे मागत पूजन केले.

शेतकऱ्यांचे हाल

यंदाच्या वर्षी नाशिकलगतच्या गावांमधून शेकडो शेतकरी गोवऱ्या विक्रीसाठी रविवारपासून (दि. ५) शहरात दाखल झाले होते. परंतु, मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पावसाने त्यांचे हाल झाले. पावसापासून गोवऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होती. सकाळी उजाडल्यानंतर काही शेतकऱ्यांनी मिळेल त्या दरात गोवऱ्यांची विक्री करत गावाकडे परतले.
वीरांची आज मिरवणूक

जिल्ह्यात होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलिवंदनाला सायंकाळी वीरांचा पाडवा मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याची पद्धत पूर्वापार चालत आली आहे. यंदाच्या वर्षी मंगळवारी (दि.७) पाडवा साजरा होणार आहे. नाशिक शहरात दाजिबा, बाशिंग या प्रमुख वीरांची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच घरोघरी वीर पूजनासाठी भाविकांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

हेही वाचा :

The post नाशिककरांनी केले होळीचे दहन appeared first on पुढारी.

Exit mobile version