Site icon

नाशिकच्या जुन्या प्रकल्पांना महाअर्थसंकल्प 2023-24 मध्ये मिळाली गती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि.९) विधिमंडळामध्ये महाराष्ट्राचे २०२३ चे बजेट सादर केले. या बजेटमध्ये नाशिकमधील रेल्वे, मेट्राे, सिंचनाचे प्रकल्प, लॉजिस्टिक पार्क, तीर्थक्षेत्र विकास या जुन्याच प्रकल्पांना चालना देण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली. यामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून या प्रकल्पांच्या पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिककरांसाठी हा मोठा दिलासाच आहे. मात्र, त्याचवेळी नाशिक शहर व जिल्ह्यातील पायाभूत सुविधा; २०२७ चा कुंभमेळा, नाशिक विमानतळ, कांदा व अन्य शेतीमालावरील प्रक्रिया उद्योगांबाबत बजेटमध्ये नामोल्लेखही नसल्याने नाशिककरांमध्ये याबाबत काहीसा नाराजीचा सूरदेखील आहे.

शिवचरित्र उद्यान
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषक सोहळ्याचे यंदा ३५० वे वर्षे आहे. यानिमित्ताने २५० कोटी रुपये खर्च करून शासनाने नाशिक, मुंबई, अमरावती, छत्रपती संभाजीनगर व नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्यान उभारण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमधील उद्यानामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पुढील पिढीसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरणार आहे.

सारथीला ५० कोटी
त्र्यंबकेश्वर रोडवरील दूध डेअरीच्या जागेवर छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेचे (सारथी) उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालय तसेच प्रत्येकी ५०० मुला-मुलींसाठीचे वसतिगृह उभारण्यात येत आहे. त्यासाठी शासनाने अर्थसंकल्पात ५० कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे संस्थेचे कार्यालय व वसतिगृह उभारणी कार्याला वेग येणार आहे. त्याचा फायदा विभागातील पाचही जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना होणार आहे.

नदीजोड प्रकल्पांना गती
जिल्ह्यातील दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्पाला राज्य शासन निधी उपलब्ध करून देणार आहे. नारपार, अंबिका, औरंगा, दमणगंगा, वैतरणा, उल्हास नद्यांच्या उपखोऱ्यांमधील वाया जाणारे पाणी नदीजोड प्रकल्पांद्वारे वापरात आणण्यात येणार आहे. नाशिक, जळगाव व मराठवाड्याला त्याचा फायदा होईल, असा दावा शासनाकडून केला जातोय. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकल्पांची चर्चा असून, यंदा शासनाने निधीचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे प्रकल्प मार्गी लागतील, अशी अपेक्षा जिल्हावासीयांची आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिराचे संवर्धन
शासनाने श्री त्र्यंबकेश्वरासह भीमाशंकर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ व परळी वैजनाथ या पाचही ज्योर्तिर्लिंगाच्या संवर्धनासाठी ३०० कोटींचा निधी अर्थसंकल्पात मंजूर केला आहे. २०२७ मध्ये कुंभमेळादेखील होत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर व परिसराच्या संवर्धनाचा निर्णय शासनाने घेत त्यासाठी निधीही दिल्याने शिवभक्तांमध्ये उत्साह आहे. कुंभमेळ्यापूर्वी ही कामे मार्गी लागवी, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

नाथांची वारी होणार निर्मल
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, जगद्गुरू संत तुकाराम महाराज, सोपानदेव महाराज, संत निवृत्तिनाथ महाराज व संत मुक्ताई यांच्या निर्मलवारीसाठी अर्थसंकल्पात २० कोटींची तरतूद शासनाने केली आहे. वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ असलेल्या संत निवृत्तिनाथ यांच्या वारीला राजाश्रय मिळावा, अशी गेल्या कित्येक वर्षांपासूनची वारकऱ्यांची प्रलंबित मागणी यानिमित्ताने सत्यात उतरली आहे.

विरंगुळा केंद्राचा नाशिक पॅटर्न
शासनाने प्रत्येक महापालिका क्षेत्रात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगरसेवक अजय बोरस्ते यांनी सर्वप्रथम या संदर्भात मागणी केली होती. बोरस्ते यांनी गेल्या महिन्यात आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांना निवेदन देत महापालिका अर्थसंकल्पात विरंगुळा केंद्रासाठी निधीची मागणी केली होती. शासनाने पुढाकार घेत प्रत्येक मनपा क्षेत्रात या प्रकारचे केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नाशिकचा विरंगुळा केंद्राचा पॅटर्न आता राज्यभरात अंमलात येण्यास मदत मिळणार आहे.

रेल्वेला निधी; नागरिक सुखावले
बहुचर्चित नाशिक-पुणे सेमीहायस्पीड रेल्वेमार्गासाठी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा अर्थसंकल्पात आहे. पण त्याची सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. मुळातच प्रकल्पाला केंद्र शासनाची अंतिम मंजुरी मिळणे बाकी आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या उभारणीवरून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अशा परिस्थितीत विधिमंडळात उपमुख्यमंत्र्यांनी निधीची घोषणा केल्याने नाशिक व पुणे या दोन्ही शहरांमधील नागरिक सुखावले आहेत.

लॉजिस्टिक पार्कला चालना
नुकत्याच सादर करण्यात आलेल्या महापालिकेच्या अंदाजपत्रकात बहुचर्चित लॉजिस्टिक पार्कबाबत ओझरता उल्लेख केला गेला. त्यामुळे या प्रकल्पाला आता तरी चालना मिळेल काय? अशी नाशिककरांमध्ये कुजबुज सुरू असतानाच अर्थसंकल्पात लॉजिस्टिक पार्क धोरण लवकरच अंमलात आणले जाणार असल्याचे स्पष्ट केल्याने आडगावमधील लॉजिस्टिक पार्क प्रकल्पाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. अर्थसंकल्पात नागपूर येथे एक हजार एकरवर लॉजिस्टिक हब उभारले जाणार आहे. तर नाशिकसह नागपूर, एमएमआर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी असे सहा सर्क्युलर इकॉनॉमी पार्क उभारले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

निओ मेट्रोला गती
लॉजिस्टिक पार्कप्रमाणे सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या निओ मेट्रो प्रकल्पालाही चालना देण्याबाबत अर्थसंकल्पात उल्लेख करण्यात आला आहे. निओ मेट्रो प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्र शासनाला सादर केला जाणार असून, लवकरच हा प्रकल्प पूर्णत्वास येण्याची शक्यता आहे. मात्र, इतर शहरांमध्ये मेट्रो आणि नाशिकची समजूत टायर बेस निओ मेट्रो देऊन का काढली. फक्त बस जाणारा फ्लायओव्हर असा त्याचा अर्थ. नाशिकला मेट्रो का नको? असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.

विमानतळाच्या विस्ताराला मात्र ठेंगा
नाशिक विमानतळावरून विविध शहरांमध्ये सेवा देणाऱ्या विमान कंपन्यांना आतापर्यंत मोठा लाभ झाला आहे. मात्र, अशातही अर्थसंकल्पात नाशिकच्या विमानतळाच्या विस्ताराबाबत नामोल्लेख केला गेला नाही. याउलट शिर्डी विमानतळावर नवे प्रवासी टर्मिनसकरिता ५२७ कोटींची तरतूद केली गेली. त्याशिवाय छत्रपती संभाजीनगर विमानतळ भूसंपादनासाठी ७३४ कोटींची तरतूद केली.

The post नाशिकच्या जुन्या प्रकल्पांना महाअर्थसंकल्प 2023-24 मध्ये मिळाली गती appeared first on पुढारी.

Exit mobile version