Site icon

नाशिकमध्ये कडाक्याची थंडी, शहराचा पारा ९.८ अंशांवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

उत्तर भारतामधून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे दोन दिवसांपासून शहराच्या पाऱ्यात घसरण झाली आहे. रविवारी (दि. २०) पारा ९.८ अंशांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे आठवडाभरापासून गुलाबी थंडीचा अनुभव घेणाऱ्या नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. थंडीपासून बचावासाठी उबदार कपड्यांची मदत घेतली जात आहे.

पाकिस्तानामधील चक्रावाताने हिमालयात बर्फवृष्टी होत आहे. परिणामी उत्तर भारताकडून येणाऱ्या शीतलहरींचा वेग वाढला आहे. त्यामुळे शहराच्या पाऱ्यात लक्षणीय घसरण झाली आहे. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच पारा १० अंशांखाली आल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. रविवारी दिवसभर हवेत गारठा जाणवत असल्याने सुटीचा दिवस असूनही नाशिककरांनी घरातच बसणे पसंत केले. तसेच थंडीपासून वाचण्यासाठी नागरिकांचा उबदार कपडे परिधान करण्याकडे कल पाहायला मिळताे आहे.

चालू वर्षी नाशिकमध्ये पावसाने सरासरी ओलांडली. अनेक तालुक्यांत प्रमाणापेक्षा अधिक पर्जन्याची नोंद झाली. ऑक्टोबर एण्डपर्यंत पावसाने मुक्काम ठोकल्याने यंदा थंडीचा कडाकाही जाणवेल, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, शहरात नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत म्हणावा तसा गारठा पडलेला नव्हता. पण, दोन दिवसांपासून पाऱ्यात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे थंडीचा जोर अधिक वाढला आहे. वातावरणात अचानक झालेल्या या बदलामुळे शहरवासीय गारठून गेले आहेत. दरम्यान, पुढील २४ तास थंडीचा कडाका कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

शेकोट्यांभोवती गर्दी

थंडीच्या वाढत्या कडाक्यासोबत शहर-परिसरात पहाटे व रात्रीच्या वेळी शेकोट्या पेटविल्या जात आहेत. या शेकोट्यांभोवती नागरिक गर्दी करत आहेत. तसेच नागरिकांनी उबदार कपडेही कपाटातून बाहेर काढले आहेत. थंडीचा जोर बघता विशेष करून बच्चेकंपनी आणि ज्येष्ठ नागरिकांची अधिक काळजी नाशिककर घेत आहेत.

पहाटे मैदाने फुल्ल

पहाटेच्या वेळी पडणाऱ्या दवबिंदूमुळे शहर धुक्यात हरवून जात आहे. त्यातच थंड वाऱ्यांचा वेगही अधिक असतो. मात्र, तरीही या वातावरणात नाशिककर फिरण्यासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडताना दिसत आहेत. तसेच पहाटे व सायंकाळी शहर-परिसरातील जॉगिंग ट्रॅक व मैदाने नागरिकांच्या गर्दीमुळे फुल्ल होत आहेत.

शहरात १० दिवसांचे किमान तापमान

तारीख – अंश सेल्सिअस

११             १३.८

१२             १३.९

१३             १४.३

१४             १५.१

१५             १५.२

१६             १४.४

१७             १३.९

१८             ११.२

१९             १०.४

२०             ९.८

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये कडाक्याची थंडी, शहराचा पारा ९.८ अंशांवर appeared first on पुढारी.

Exit mobile version