Site icon

नाशिकमध्ये नायलॉन मांजा विक्रेत्यांचे दणाणले धाबे, थेट करताय तडीपार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहर पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाईचा धडाका लावला आहे. मांजा विक्रेत्यांवर लक्ष ठेवून किंवा त्यांची माहिती मिळताच पोलिसांकडून सापळे रचून विक्रेत्यांना पकडले जात आहे. त्यामुळे विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून, काही विक्रेते २० दिवसांसाठी शहरातून तडीपार केल्यानेही कारवाईचा धाक वाढला आहे.

सातपूर पोलिसांनी भंदुरे मळ्यात कारवाई करीत अजय गंगाराम प्रधान (१९) यास नायलॉन मांजा विक्री करताना पकडले. त्याच्याकडून तीन हजार ६०० रुपयांचा मांजाचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात पोलिस अंमलदार मोहन गणपत भोये यांनी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने पवन विलास चव्हाण (२१, रा. शिवाजी चौक, भगूर) यास भगूर बसस्थानकाजवळून पकडले. पवनकडून पोलिसांनी पाच हजार ८५० रुपयांचा नायलॉन मांजाचा साठा हस्तगत केला आहे. त्याच्याविरोधात पोलिस हवालदार गुलाब सोनार यांनी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तिसऱ्या कारवाईत गंगापूर पोलिसांनी ध्रुवनगर येथे कारवाई करून अनिकेत अशोक कापुरे (२२, रा. शिवशक्ती कॉलनी, ध्रुवनगर) यास पकडले. अनिकेतजवळून १९ हजार ५०० रुपयांचा नायलॉन मांजाचा साठा आढळून आला. त्याच्याविरोधात पोलिस नाईक रवींद्र मोहिते यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात भारतीय दंड विधानसह पर्यावरण संरक्षण कायदा व महाराष्ट्र पोलिस अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जात आहे. ज्या विक्रेत्यांवर दोन किंवा दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे.

पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईत नायलॉन मांजा विक्रेते बहुतांश प्रमाणात तरुण असल्याचे समोर येत आहे. पोलिसांच्या कारवाईचा धाक असतानाही चोरीछुप्या पद्धतीने मांजा विक्री करताना खरेदीदारांना कारवाई सुरू असल्याचे सांगत चढ्या दराने मांजा विक्री केली जात आहे. त्यामुळे कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त नफा कमवण्याच्या हेतूने युवक मांजा विक्री करत असल्याचे समोर येत आहे.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये नायलॉन मांजा विक्रेत्यांचे दणाणले धाबे, थेट करताय तडीपार appeared first on पुढारी.

Exit mobile version