Site icon

नाशिकला दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट, घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात गुरुवारी (दि. 7) सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून, इगतपुरी परिसराला अक्षरश: झोडपून काढले. नाशिक शहरातदेखील दिवसभर अधूनमधून जलधारा कोसळल्या. दरम्यान, जिल्ह्याला पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला. विशेषत: घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.

जूनअखेर नाशिकमध्ये अपेक्षित पाऊस झालेला नाही. मात्र, दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सक्रिय झाला आहे. त्यातही गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. इगतपुरीत दिवसभर पावसाने दणका दिला आहे. र्त्यंबकेश्वर परिसरातही आगमनाने मध्यम ते जोरदार सरी बरसल्या. नाशिक शहर व परिसरात पावसाचा खेळ सुरू होता. रात्री उशिरापर्यंत अधूनमधून मध्यम ते जोरदार सरी बरसल्या. पंचवटी परिसर, आडगाव, नाशिकरोड, सिडको, सातपूर, इंदिरानगर आदी उपनगरांमध्येदेखील हजेरी लावल्याने सर्वसामान्यांमध्ये उत्साह आहे.

पावसामुळे शहरात स्मार्टसिटीच्या कामांमुळे खोदलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचण्याच्या घटना घडल्या. तर रस्त्यांमधील खड्डे वाचविताना वाहनचालकांची दमछाक झाली. शहरात सकाळी साडेआठ ते साडेपाच यावेळेत 6.8 मिमी पर्जन्याची नोंद झाली. पेठ, सुरगाण्यासह दिंडोरी, मालेगाव, चांदवड, निफाडसह अन्य तालुक्यांमध्येही सरी बरसल्या. त्यामुळे शेतकरीवर्ग सुखावला असून, शेतीच्या कामांना पुन्हा एकदा वेग आला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 193. मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून, वार्षिक सरासरीच्या 20.8 टक्के इतके प्रमाण आहे.

हेही वाचा :

The post नाशिकला दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट, घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज appeared first on पुढारी.

Exit mobile version