Site icon

नाशिक : छत्रपती सेनेचा शिंदे गटाला पाठिंबा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
छत्रपती सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेने मुख्यमंत्री शिंदे गटाला पाठिंबा दर्शविला आहे. ही संघटना गेल्या सहा वर्षांपासून महाराष्ट्रात कार्यरत आहे. आजवर कोणत्याही राजकीय पक्ष वा व्यक्तीसोबत ही संघटना जोडली गेली नाही. काही सामाजिक प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने संघटना मुख्यमंत्र्यांना जोडली गेली असल्याचे संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार यांनी सांगितले.

छत्रपती सेना महाराष्ट्र राज्य ही संघटना 18 पगडजाती, 12 बलुतेदारांना सोबत घेऊन गेल्या सहा वर्षांपासून कार्यरत आहे. राज्यात 23 जिल्ह्यांत संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते कार्यरत आहेत. संघटनेच्या माध्यमातून सुमारे 90 हजार युवक-युवती जोडले गेले आहेत. काही प्रश्नांसंदर्भात छत्रपती सेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घालत सोडविण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्रात होणारी बांगलादेशी व परप्रांतीय यांची घुसखोरी थांबवावी, छत्रपती शिवाजी महाराज व अखंड भारताचे प्रेरणास्रोत माँसाहेब जिजाऊ यांचे पूर्णाकृती स्मारक व शिवालय (शिवकालीन नोंदींचे ग्रंथालय) नाशिकमधील छत्रपती शिवाजी उद्यान सीबीएस येथे उभारावे, राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत शासनाने राज्य फेरीवाला महामंडळ स्थापन करावे, छत्रपती सेनेच्या माध्यमातून फेरीवाला रोल मॉडेल म्हणून नाशिक सेंट्रल मार्केटच्या उभारणीचे काम सुरू असून, त्यास विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, नाशिक शहर व ग्रामीण विकासावर भर द्यावा तसेच पुरातत्त्व विभागाला निधी द्यावा, सारथी संस्थेमार्फत केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करावी, सारथीच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरू करावे, पंजाबराव देशमुख वसतिगृहाची निर्मिती करावी, नाशिक-सिन्नर रस्त्यावरील टोलनाका बंद करावा, शाळा व महाविद्यालयांजवळील टवाळखोरी बंद करावी, उद्योग व्यवसायात स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य द्यावे, आदी मुद्द्यांवर छत्रपती सेनेने शिंदे गटाला पाठिंबा दर्शविल्याचे संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार, कार्याध्यक्ष नीलेश शेलार, कोअर टीम अध्यक्ष तुषार गवळी यांनी कळविले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : छत्रपती सेनेचा शिंदे गटाला पाठिंबा appeared first on पुढारी.

Exit mobile version