Site icon

नाशिक : दुहेरी फायरसेसच्या जाचातून उद्योजकांची सुटका करणार – मनपा आयुक्त

सिडको : पुढारी वृत्तसेवा
दुहेरी फायरसेसच्या जाचातून अंबडच्या उद्योजकांची सुटका करण्यासाठी अग्निशमन केंद्र ताब्यात घेण्याची तयारी नाशिक महानगरपालिकेची आहे. यासंदर्भात एमआयडीसीच्या मुख्याधिकार्‍यांना लवकरच पत्र पाठवून त्यांची मंजुरी घेण्याचे आश्वासन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले, अशी माहिती अंबड इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा)चे अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी दिली.

महापालिका आयुक्तांच्या दालनात आयमाचे पदाधिकारी, महापालिका आणि एमआयडीसीचे अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली, यात विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, धनंजय बेळे, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, सरचिटणीस ललित बुब, कोषाध्यक्ष राजेंद्र कोठावदे, चिटणीस गोविंद झा, योगिता आहेर, एमआयडीसीतर्फे नितीन गवळी, बाळासाहेब झांजे, जे. सी. बोरसे, जयंत पाटील तसेच महापालिकेतर्फे उपआयुक्त अर्चना तांबे चर्चेत सहभागी झाले होते. कारखान्यांतील रसायन व जलमिश्रित सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र (सीईपीटी) उभारायची तयारी एमआयडीसीने दाखवली आहे. मात्र, कारखान्यांमधून वाहणारे पाणी महापालिकेच्या सांडपाणी वाहिनीत टाकण्याची मुभा हवी आहे आणि टेरी तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या लॅबने त्यास हिरवा कंदील दाखविल्याची माहिती आयमाच्या पदाधिकार्‍यांनी दिली. या दोन्ही यंत्रणांकडून हिरवा कंदील मिळाल्यास परवानगी देण्यास आपणास अडचण नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. एसटीपी (सिवेज ट्रीटमेंट प्रोजेक्ट) साठी अमृत योजनेंतर्गत डीपी प्लॅन काढून अंदाजपत्रकीय तरतुदीचा प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासनही आयुक्तांनी दिले. नाशिक – गोंदे तसेच विल्होळी येथे सिटीलिंक बससेवा सुरू करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. तसेच नाशिकहून ओझर विमानतळ सिटीलिंक बससेवेचा मुद्दाही उद्योजकांनी मांडल्यानंतर या मागण्यांचा अवश्य विचार करू, असे आयुक्तांनी सांगितले, अशी माहिती पांचाळ यांनी दिली.

हेही वाचा:

The post नाशिक : दुहेरी फायरसेसच्या जाचातून उद्योजकांची सुटका करणार - मनपा आयुक्त appeared first on पुढारी.

Exit mobile version