Site icon

नाशिक : महापालिकेतर्फे 2500 पदांच्या नोकरभरतीसाठी तयारी सुरु

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका, नगर परिषदांमधील ४० हजार पदांच्या भरतीची घोषणा केल्यामुळे अनेक वर्षांपासून नोकरभरतीची प्रतीक्षा करणाऱ्या नाशिक महापालिकेने भरतीसाठी आता जय्यत तयारी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने अग्निशमन, वैद्यकीय विभागांतील ७०४ पदांसह विविध विभागांमधील सुमारे अडीच हजार पदांच्या भरतीसाठी मनपातील ११ विभागांच्या सेवा प्रवेश नियमावलींचे प्रस्ताव प्रशासन विभागाने गुरुवारी (दि. २) होणाऱ्या महासभेच्या मान्यतेसाठी सादर केले आहेत.

महापालिकेच्या आस्थापनेवर विविध संवर्गातील ७,०९० पदे मंजूर आहेत. त्यापैकी सुमारे अडीच हजारांहून अधिक पदे आजमितीस रिक्त आहेत. असे असताना गेल्या २१ वर्षांपासून महापालिकेत नोकरभरतीच झालेली नाही. ब संवर्ग प्राप्त झाल्यानंतर नाशिक मनपाने १४ हजार पदांचा सुधारित आकृतिबंध शासनाकडे मंजुरीसाठी सादर केला होता. मात्र, शासनाने गेल्या आठ वर्षांत त्यास मंजुरी दिली नाही. शहराचा वाढता विस्तार आणि मनपाकडे उपलब्ध मनुष्यबळ यामुळे नागरिकांना सेवा-सुविधा पुरविताना मनुष्यबळ अपुरे पडू लागले आहे. नोकरभरतीकरिता मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा केल्यानंतर तसेच कोरोना महामारीमुळे मनुष्यबळाची नितांत आवश्यकता भासल्याने गेल्यावर्षी शासनाने अग्निशमन विभागाच्या ३४८, तर वैद्यकीय विभागातील ३५८ अशा एकूण ७०४ पदांच्या भरतीला शासनाने मान्यता दिली. या भरतीसाठी आयबीपीएस संस्थेबरोबर करार करण्यात येणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनंतर उर्वरित अडीच हजार रिक्त पदांच्या भरतीचाही जवळपास मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, पदांच्या भरतीसाठी सेवा प्रवेश नियमावलीला शासनाची मंजुरी नसल्याने नियमावलीचा प्रस्ताव महासभेवर मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.

नियमावली शासनाकडे पाठविणार

महासभेवर प्रशासकीय सेवा, लेखा व लेखापरीक्षण, वैद्यकीय व आरोग्य, विद्युत, अभियांत्रिकी (स्थापत्य), जलतरण तलाव, उद्यान व वृक्षप्राधिकरण, नाट्यगृह व सभागृह, तारांगण व फाळके स्मारक, सुरक्षा, माहिती तंत्रज्ञान या ११ विभागांच्या सेवा प्रवेश नियमावलीचे प्रस्ताव प्रशासनाने महासभेकडे सादर केले आहेत. महासभेच्या मान्यतेनंतर प्रस्ताव शासनाकडे मंजुरीकरिता सादर करण्यात येणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : महापालिकेतर्फे 2500 पदांच्या नोकरभरतीसाठी तयारी सुरु appeared first on पुढारी.

Exit mobile version