Site icon

नाशिक : शतकापूर्वीची कोहळा बळीची परंपरा वणीत आजही कायम

वणी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
येथे पारंपरिक विजयादशमीनिमित्त देवीला प्रसन्न करण्यासाठी रेड्याचा बळी देण्याऐवजी कोहळ्याचा प्रतीकात्मक पद्धतीने शिरच्छेद करण्याची शतकापूर्वीची परंपरा संपूर्ण देशमुख समाज गावातील सर्व समाजबांधवांसह आजही पाळत आहे. विशेष म्हणजे रेड्याला बळी देण्याऐवजी कोहळा बळीची प्रतीकात्मक प्रथा गाडगे महाराज व त्यांचे शिष्य अवघडानंद यांच्या आदेशानुसार सुरू होऊन, ती आजही टिकून आहे. त्यामुळे येथे विजयादशमीचा आनंद खर्‍या अर्थाने द्विगुणित होत असल्याची भावना गावकर्‍यांची आहे.

वणी : पूर्वीच्या वणी येथे सीमोल्लंघनाच्या वेळी रेड्याचा बळी दिला जायचा. तेव्हाचा संपतराव आपाजीराव देशमुख यांचा सन 1923 च्या अगोदरचे छायाचित्र

बि—टिशकालीन राजवटीत संस्थान, जहागिरी व इनामे प्राप्त देशमुख समाजाकडे गावातील रुढी, परंपरा, सण, उत्सव एकोप्याने साजरे करण्याची जबाबदारी होती. संपतराव आपाजीराव देशमुख हे त्याकाळी लोकल बोर्डाचे अध्यक्ष होते. बि—टिश सरकारकडून त्यांना समारंभ व उत्सवाचे निमंत्रण मिळाले व त्यांनी म्हैसूर व पश्चिम बंगालमध्ये विजयादशमी पर्वात रेड्याचा बळी देण्याची प्रथा पाहिली. बळीनंतर सुख-शांती, सुरक्षितता, धनधान्य वाढ होते, अशी त्यावेळी धारणा होती. त्यांनी 1923 साली ही प्रथा वणी येथे सुरू केली. सीमोल्लंघन करण्यासाठी गावाच्या वेशीवर जाऊन रेड्याचे पूजन केले जायचे. चंद्रभान या शस्त्राने एकाच वारात शिरच्छेद केला जात असे. त्यानंतर रेड्याला वेशीवर पुरले जायचे. आपट्याची पाने लुटून सीमोल्लंघन करण्यात येई. त्या दरम्यान गाडगे महाराज व त्यांचे शिष्य अवघडानंद यांचे वणीत आगमन झाले.

संपतराव देशमुख यांना ही प्रथा बंद करून कोहळ्याचा प्रतीकात्मक पद्धतीने शिरच्छेद करण्याचे दिलेले आदेश देशमुख समाजाने मानले आणि तेव्हापासून कोहळ्याच्या बळीची प्रथा सुरू झाली. राजेंद्र देशमुख, संजय देशमुख यांच्यासह मानकरी म्हणून धनंजय देशमुख, चंद्रवदन देशमुख, विक्रांत देशमुख, अजिंक्य देशमुख, आदित्य देशमुख, ऋत्विक देशमुख, अर्णव सूर्यराव यांनाही पालखीचा मान आहे. पालख्या सीमोल्लंघनाच्या ठिकाणी आल्यानंतर प्रतीकात्मक कोहळ्याचा बळी देण्यात आला.

हेही वाचा :

The post नाशिक : शतकापूर्वीची कोहळा बळीची परंपरा वणीत आजही कायम appeared first on पुढारी.

Exit mobile version